पुण्याला अतिउष्णतेचा सर्वाधिक तडाखा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 8 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पुणे शहर एकेकाळी प्रदूषणमुक्त, शिवाय शांत-शीतल शहर म्हणून गणले गेले, परिणामी अनेकांनी स्थायिक होण्यासाठी या नगरीची निवड केली. आज तेच शहर देशातील सर्वांत उष्ण शहर बनले असल्याचा निष्कर्ष एका राष्ट्रीय अभ्यासात काढण्यात आला आहे.

विज्ञान आणि पर्यावरण केंद्र या विचारगटाचा ‘पर्यावरणाची सद्य:स्थिती २०२४’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. निवडक शहरांमध्ये पुण्याचे भूपृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान सर्वांत अधिक ४९.०४ अंश सेल्सिअस असून त्या खालोखाल दिल्ली ४७.९९ अंश सेल्सिअस, जयपूर ४७.६३ व कोलकता ४१.९९ अंश आहे.

भूपृष्ठभागाच्या तापमानाचे मापन उपग्रहाद्वारे केले जाते व त्यानंतर वर्षभरात या शहरांना भेटी देऊन त्याचे ४० नमुने गोळा करून या निष्कर्षावर तज्ज्ञ आले आहेत. पुणे हे देशातील एक उष्ण शहर बनल्याचा निष्कर्ष काढताना या नगरीच्या ८० टक्क्यांहून अधिक भागाला उष्णतेच्या लाटेने विळखा घातल्याचे अहवालात नमूद केले आहे. आज येथे ‘अनिल अग्रवाल सुसंवाद’ परिषदेत देशभरातील पत्रकार व पर्यावरण तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

अतितीव्र हवामान ३१८ दिवस
मानवी इतिहासात २०२३ हे वर्ष सर्वांत तप्त वर्ष गणले गेले आहे. ३६५ दिवसांतील ३१८ दिवस हे अतितीव्र हवामानाचे अनुभव देणारे ठरले व आगामी वर्षातही ही भीषण परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान भारतात सलग १२३ दिवस तीव्र हवामानाच्या घटनांची नोंद झाली.

हवामानाशी संबंधित तीव्र घटनांमुळे ३,२८७ जणांचा मृत्यू झाला. तसेच १.२४ लाख जनावरांनाही प्राण गमवावे लागले. त्याचप्रमाणे, सुमारे २० लाख पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, अशी आकडेवारीही या अहवालात दिली आहे. अतिउषणतेचा आरोग्यावर परिणाम होईल, तसेच शेती व जलदुर्भीक्ष्याचे संकट गंभीर बनणार असल्याचे संशोधन आहे. भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या शहरांनी हरित उद्दिष्टांकडे काणाडोळा केल्यास जनतेच्या हालअपेष्टा आणखी वाढतील.

केवळ १.४ चौरस मीटर हिरवा भूभाग
शहरी भागात दरडोई नऊ चौरस मीटर हिरवा भूभाग असावा, असा जागतिक आरोग्य संघटनेचा निकष आहे. पुणे शहरात असा हरित भूभाग दरडोई केवळ १.४ चौरस मीटर आहे, असे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. दिल्ली, जयपूर व कोलकताच्या मानानेही हे प्रमाण खूप कमी आहे.

इमारतींच्या रचनेचा परिणाम
शहरांची व त्यातील इमारतींची रचना योग्य पद्धतीने न झाल्यास दिवसाही उष्णता धरून ठेवली जाते व रात्रीही उष्णतेच्या झळा वाहतात, असे अहवालात नमूद केले आहे. शहरांमधील इमारतींची रचना समान नसते. पुणे, दिल्ली, जयपूर, कोलकता या चार शहरांमधील रचनांचा अभ्यास केला असता, पुण्यातील तापमानात चढ-उतारांचे स्वरूप खूपच आढळले.

औद्योगिक भागांत हे प्रमाण अधिकच गंभीर आहे. काही भागांमध्ये हे तापमान ५२.८८ अंश सेल्सिअस एवढे तीव्र आहे. कोलकता व पुणे शहरांमधील एक साम्य म्हणजे, उष्ण भूभागांमध्ये तेथे हिरवे किंवा निळे पट्टे नाहीत; तर याठिकाणी पत्र्यांची अथवा ॲस्बेस्टॉसचे पत्रे घातलेले आढळतात. कोलकत्यात काही ठिकाणी जलाशय व तलाव सुरक्षित राखले आहेत.

ही आहेत उष्ण शहरे (उष्णतेचा विळखा असलेला भूभाग टक्क्यांत)
सलग दहा वर्षे ज्या शहराचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले, त्यांचा देशातील उष्ण केंद्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या शहरांतील ‘हिरव्या’ व ‘निळ्या’ भूभागांची संख्या कमी झाली आहे.

पुणे (८० टक्के)
जयपूर (४२ टक्के)
दिल्ली (३५ टक्के)
कोलकता (३२ टक्के)

वाढत्या उष्णतेचे परिणाम
पर्यावरणाला धोकादायक ठरणारे ७० टक्के उत्सर्जन शहरांमधूनच

आरोग्यसेवेवर ताण
हृदय, फुप्फुसांसंबंधी आजार व श्‍वसनाचे विकार वाढण्याची शक्यता
वाढत्या ऊर्जा वापराने हरितगृह वायूंच्या प्रमाणात वाढ
हवामानबदलाच्या प्रक्रियेला वेग

सुचविलेले उपाय
स्थानिक स्वराज्यसंस्थांनी शीतल छप्पर व सावल्या देणारी व्यवस्था निर्माण करावी
‘हरित नियमां’चे पालन आवश्‍यक
बागा व हिरवळीची निर्मिती
पाणीसाठे व नद्यांची स्वच्छता
खासगी वाहतुकीवर निर्बंध व सार्वजनिक सेवेवर भर