संस्कृती आणि परंपरेने नटलेले, अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांचे हे महाराष्ट्र राज्य आहे. आपली संस्कृती आणि परंपरा जपली जाते ती खऱ्या अर्थाने गावाकडे. शहरातील लोकांना गावातील परंपरांची ओळख करून देण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून भीमथडी जत्रेचे आयोजन केले जाते. गावाकडील खाद्य संस्कृती, हस्तकला, हातमाग अशा विविध गोष्टींमुळे ही जत्रा लोकप्रिय आहे. यंदाची भीमथडी जत्रा पुण्यातील कृषी महाविद्यालय (सिंचननगर) येथे भरली आहे. यामध्ये दोनशेहून अधिक स्टॉल उपलब्ध आहेत. या स्टॉल पैकी नागरिकांच्या, खरेदीदारांच्या आकर्षणाचे ठिकाण ठरतंय ते या जत्रेतील शहाजहान नदाफ यांचे फैयाज जेन, घोंगडी व गादी सेंटर.
शहाजहान नदाफ हे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रहिवासी आहेत. शहाजहान नदाफ त्यांच्या स्टॉलविषयी माहिती देताना म्हणतात, “आमच्या इथे लोकरापासून तयार केलेल्या सर्व वस्तु आहेत. हस्तकलेचा वापर करून लोकरापासून विविध वस्तु तयार करण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. यामध्ये लोकरापासून तयार केलेली चप्पल, शाल, जेन, गालिचे, उशी अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे.”
वस्तु तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल आणि प्रक्रियेविषयी ते म्हणतात, “महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रकरणात मेंढपाळ आहेत. मेंढपाळ आम्हाला कच्चामाल पुरवतात. लोकर तयार करण्यासाठी मेंढीच्या केसाचा वापर केला जातो. लोकरापासून मोठ्या वस्तु तयार करण्यासाठी लोकर पिंजावी लागते. त्यानंतर हाताने नक्षीकाम करून लोकरीवर डिझाईन तयार केली जाते. पुढे वस्तु बनवून त्याला गुडघ्याने लाटले जाते. या कामात खूप कष्ट घ्यावे लागतात.”
नदाफ यांच्या स्टॉलला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
हस्तकलेतून तयार होणाऱ्या पारंपरिक वस्तूंना महाराष्ट्रात आणि देशात मोठी मागणी आहे. नदाफ यांनी बनवलेल्या वस्तूंना भीमथडी यात्रेत मोठा प्रतिसाद मिळत आहे. याविषयी बोलताना नदाफ म्हणतात, “भीमथडी यात्रेत आम्ही लोकरीपासून तयार केलेल्या अनेक वस्तु आणल्या होत्या. पुण्यातील आणि इतर शहरातील नागरिकांनी सुरवातीच्या दोन दिवसात सर्व वस्तु खरेदी केल्या. आता फक्त काही गालिचे आणि जेन, चप्पल उरल्या आहेत. महाराष्ट्रभरातून आम्हाला खूप लोक संपर्क करतात. लोकरीच्या वस्तूंची मागणी करतात. भीमथडी यात्रेत देखील नागरिकांना आमच्या स्टॉलला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.”
नदाफ यांच्याकडून चप्पल आणि गालिचे खरेदी करणाऱ्या इंदुमती चव्हाण म्हणतात, “आम्ही अनेक वर्षांपासून शहरात राहत आहे. फक्त सुट्टीमध्ये गावाकडे जाणे होते. त्यामुळे गावाशी जास्त संबंध येत नाही. पण आज गावातील परंपरा आणि संस्कृती भीमथडी यात्रेत अनुभवायला मिळाली. आम्ही आता लोकरीपासून तयार केलेली चप्पल आणि गालिचे घेतले आहेत. अतिशय आरामदायक ही चप्पल असून हातकामातून तयार झालेली गालीच्यावरची डिझाईन सुंदर आहे.”
या लोकरापासून विणलेल्या वस्तूंचे वैशिष्ट्य सांगतात यूसुफ नदाफ म्हणतात, “ लोकरापासून तयार केलेली चप्पल हिवाळ्यात गरम तर उन्हाळ्यात थंड राहते. तर जेन पाठदुखी, अंगदुखी, वात येणे, अशा व्यादींचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.”
वस्तूंच्या टिकाऊपणामुळे ग्राहक पुन्हा येत नाही?
पारंपारिक व्यवसाय, वस्तूंची मोठी मागणी असली तरी ग्राहक पुन्हा येईल याची खात्री नाही. याविषयी बोलताना शहाजहान नदाफ म्हणतात, “आमचा व्यवसाय वाडीलोपार्जित असला तरी पुढील पिढी हा व्यवसाय करेल का हे माहीत नाही. कारण लोकरीपासून वस्तु बनवणे कष्टाचे काम आहे. वस्तु बनवण्यासाठी वेळ लागतो. आता हा व्यवसाय करणारे लोक कमी झाले आहेत. काही ठराविक लोक हा व्यवसाय करत आहेत. तरीदेखील या वस्तूंना मोठी मागणी आहे. लोकरीपासून बनवलेल्या वस्तु वर्षानुवर्षे टिकतात. त्यामुळे तो ग्राहक पुन्हा आपल्याकडे येईल हे माहीत नाही.”
यंदाची भीमथडी जत्रा
कृषी, सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाला वाव देण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून भीमथडी जत्रा भरत आहे. यंदा भीमथडी जत्रेचे १८ वर्ष आहे. सिंचननगर येथे भरलेल्या जत्रेत देशातील दहाहून अधिक राज्यांनी आणि महाराष्ट्रातील १५ पेक्षा जास्त जिल्ह्यांनी सहभाग घेतला आहे.
यावर्षी भीमथडी जत्रेत पद्मश्री (कै) अप्पासाहेब पवार यांना २५व्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या ठिबक सिंचन सुरू करण्यासह भारतीय शेतीमधील महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव केला आहे. तसेच ग्रामीण उद्योगाला आणि महिला सक्षमीकरणाला चलना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.
अलीकडच्या काळात लोक प्राथमिक गरजा भागवण्यासाठी शहरांचा रस्ता धरत आहेत. यामुळे त्यांची गावाशी जुळलेली नाळ हळूहळू तुटत चालली आहे. गावातील विविधता शहरातील नागरिकांना अनुभवता यावी, गाव आणि शहरांची नाळ जुडून रहावी यासाठी भीमथडी जत्रा महत्वाची ठरत आहे.