शुक्रवारी अमेरिकेतील शेअर मार्केट बंद होताना अॅपल कंपनीने मोठा इतिहास रचला. अॅपलची मार्केट कॅप ही तब्बल ३ ट्रिलियन डॉलर्स एवढी झाली आहे. हा टप्पा गाठणारी अॅपल पहिलीच पब्लिकली ट्रेडेड कंपनी झाली आहे.
शुक्रवारी मार्केट बंद होताना अॅपलचे शेअर्स २.३ टक्क्यांनी वधारून १९३.९७ यूएस डॉलर्सवर पोहोचला. यामुळे कंपनीची एकूण मार्केट व्हॅल्यू ३.०४ ट्रिलियन डॉलर्स एवढी झाली. यापूर्वी २०२२ मध्ये एका दिवसासाठी अॅपलने हा टप्पा गाठला होता. मात्र, दिवसाच्या शेवटी याची किंमत पुन्हा खाली गेली होती.
कशामुळे तेजी?
अॅपलच्या शेअर्समध्ये तेजी येण्यामागे बरीच कारणं सांगण्यात येत आहेत. अमेरिकेतील फेड रेट लवकरच कमी होण्याची शक्यता आहे, तसंच भविष्यात एआयच्या मोठ्या संधी दिसून येत आहेत. टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांचं रिबाऊंड होणं हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. यासोबतच, जूनमध्ये लाँच झालेले अॅपल व्हिजन प्रो हे व्हीआर हेडसेटदेखील या तेजीसाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय.
२०२३ मध्ये टेक क्षेत्रात तेजी
यावर्षी अॅपलच्या शेअर्समध्ये आतापर्यंत ४६ टक्के वाढ दिसून आली आहे. याव्यतिरिक्त चिप बनवणारी कंपनी एनव्हिडियाच्या (Nvidia) शेअर्समध्येही १८५ टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे एनव्हिडियाची मार्केट कॅपदेखील १ ट्रिलियन डॉलर्सच्या वर गेली आहे.
दुसरीकडे, इलेक्ट्रिक कार बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी टेस्ला आणि सोशल मीडिया दिग्गज मेटा या कंपन्यांचे शेअर्सही आतापर्यंत दुप्पट वाढलेत. तर, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे शेअर्स यावर्षी ४० टक्क्यांनी वाढले आहेत.
अॅपल 'या' देशांपेक्षा श्रीमंत
अॅपल कंपनी आता साऊथ कोरिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा, भारत आणि सौदी अरेबिया अशा देशांपेक्षाही श्रीमंत झाली आहे. या सर्व देशांचे मार्केट कॅप हे १ ते २ ट्रिलियन डॉलर्स एवढे आहे.