भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हे लोकप्रिय सेलिब्रेटी जोडप्यांपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष ते सुखी संसार करत असून आता त्यांच्या आयुष्यात आणखी मोठे सुख आले आहे. त्यांनी बुधवारी (१६ एप्रिल) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. झहीर आणि सागरिका हे दोघे नुकतेच आई-बाबा झाले असून याबद्दल त्यांनी याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
झहीर आणि सागरिका यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्यांनी नवजात मुलासोबतचा फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये त्याचे नावही सांगितले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की 'प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादासह आम्ही आमच्या मुलाचे फतेहसिंह खान याचे स्वागत करत आहोत.' या कॅप्शनमधून त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव फतेहसिंह खान ठेवल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. यात अनेक क्रीडा आणि अभिनय क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटिंचाही समावेश आहे.
झहीर आणि सागरिका यांनी एप्रिल २०१७ मध्ये साखरपूडा केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. ८ वर्षांनंतर सुखी संसारानंतर आता त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. दरम्यान, त्यांनी मुलाच्या जन्माची तारीख सांगितलेली नाही. झहीर सध्या आयपीएल २०२५ स्पर्धेत व्यस्त आहे. तो लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. त्यामुळे तो या संघाला मार्गदर्शन करताना दिसत आहे. नुकताच लखनौचा चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १४ एप्रिल रोजी सामना झाला होता. त्यावेळीही झहीर संघासोबत दिसला होता. तो सामन्यानंतर रिषभ पंत आणि एमएस धोनीची गप्पाही मारताना दिसला होता.
सागरिका हिच्याबद्दल सांगायचे झाले, तर ती नजीकच्या काळात अभिनय क्षेत्रात फारशी दिसलेली नाही. पण तिने तिच्या कारकिर्दीत काही हिट चित्रपट दिले, ज्यात चक दे इंडिया, प्रेमाची गोष्ट अशा चित्रपटांचा समावेश आहे.
झहीर खानची कारकिर्द
झहीर खानने ९२ कसोटी सामन्यात ३११ विकेट्स घेतल्या आहेत, त्याने २०० वनडेत २८२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून १७ विकेट्स घेतल्या आहेत. झहीरने १०० आयपीएल सामने खेळले असून १०२ विकेट्स घेतल्या आहेत.