लहान मुलांसह बेघर झालेल्या संध्यासाठी 'असे' धावून आले युसुफ अली

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
LuLu ग्रुप इंटरनॅशनलचे प्रमुख युसुफ अली
LuLu ग्रुप इंटरनॅशनलचे प्रमुख युसुफ अली

 

प्रज्ञा शिंदे
एका सुंदर घराच स्वप्न संध्याने सजवलं होतं, मात्र कर्जाच्या ओझ्यामुळे तिला सात वर्षाच्या मुलाला कडेवर तर बारा वर्षाच्या मुलाला बोटाला धरून रस्त्यावर यावं  लागलं.हा मन हेलावून टाकणारा प्रवास आहे केरळमधील संध्या हिचा. मात्र आता एमए युसूफ अली यांच्यामुळे संध्या सुटकेचा नि:श्वास सोडत आहे. नेमकं काय घडलं संध्याच्या आयुष्यात आणि एमए युसूफ अली कसे ठरले तारणहार जाणून घेवूयात या विशेष लेखातून…

बिगर बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे संध्याच्या घराचा ताबा घेतला. घर ताब्यात घेतल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागाच उरली नाही. ही गोष्ट समजताच एका भारतीय अब्जाधीशाने घरातून बेदखल झालेल्या संध्याच्या  मदतीसाठी पुढाकार घेतला. अबुधाबीस्थित लुलू ग्रुपचे अध्यक्ष एमए युसूफ अली यांनी भारतातील त्यांच्या टीमला संध्या यांचे थकित कर्ज फेडण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर त्यांनी, त्यांनी तिच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणाही केली.

नेमकं काय घडलं…
संध्या उत्तर परावुर येथे राहते आणि स्थानिक कपड्याच्या दुकानात काम करते. केरळच्या लाइफ हाऊसिंग योजनेंतर्गत संध्याने घर बांधण्यासाठी मणप्पुरम फायनान्सकडून २०१९ मध्ये चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मादपलथुरुथमध्ये हे घर बांधण्यात आले होते. दुर्दैवाने २०२१ मध्ये संध्याच्या पतीने तिला आणि त्यांच्या दोन मुलांना वाऱ्यावर सोडून दिलं. त्यानंतर संध्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी संघर्ष करावा लागला. न भरलेल्या व्याजामुळे कर्जाची रक्कम कालांतराने सुमारे ८ लाख रुपये झाली. बिगर बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  सांगितले की, तीन वर्षांपूर्वी कर्जाची परतफेड थांबल्यानंतर संध्याला चार इशारे देण्यात आले होते. शेवटी मणप्पुरम फायनान्सने फोरक्लोजर म्हणजे  घर ताब्यात घेण्यास सुरुवात केली केली. कर्जाची परत फेड करता आली नाही तर कर्ज देणारा आपण गहाण ठेवलेली वस्तू ताब्यात घेवून त्याद्वारे कर्ज वसुली करतात.याच कारणामुळे संध्याचं घर कंपनीने ताब्यात घेतलं.

संध्या जेव्हा ती काम करते त्या कापडाच्या दुकानातून परत आली तेव्हा तिला आढळले की NBFC अधिकारी तिच्या घरात घुसले आहेत. त्यांनी तिचे कुलूप बदलून तिला आणि तिच्या दोन मुलांना बाहेर काढले. तिलाघरातून कोणतेही सामान नेण्याचीही परवानगी देण्यात आली नाही.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी संध्याची व्यथा लोकांपर्यंत पोहचवली. युसूफ अली यांना ही घटना समजताच संध्याला मदत करण्यासाठी ते पुढे आले. एमए युसूफ अली यांनी त्यांच्या टीमला कर्जाची संपूर्ण रक्कम फेडण्याच्या सूचना दिल्या आणि कुटुंबाला दहा लाख रुपये देवू केले. त्यातील उर्वरित रक्कम त्यांच्या भविष्यासाठी मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवण्यास सांगितले. 

“युसुफ अली नसते तर मी आणि माझी मुलं खूप मोठ्या संकटात सापडलो असतो.” असे म्हणत संध्याने युसुफ अलींचे आभार मानले.. 

कोण आहे युसूफ अली?
एमए युसूफ अली, हे "पश्चिम आशियाचे रिटेल किंग" म्हणून ओळखले जातात. एमए युसूफ अली यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५५ रोजी केरळमधील त्रिशूर येथे झाला. सुरुवातीला वकील होण्याची त्यांची इच्छा असली, तरी त्यांनी तरुण वयातच अहमदाबादमध्ये वडिलांच्या किराणा व्यवसायात प्रवेश घेतला. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर ते १९७३ मध्ये दुबईला एका नातेवाईकाच्या किराणा दुकानात काम करण्यासाठी गेले. तेथे असताना त्यांना एफएमसीजी मार्केट आणि सुपरमार्केट व्यवसायाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी अबू धाबीमध्ये त्यांचे पहिले सुपरमार्केट उघडले. इथून पुढे त्यांचा व्यापार क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. 

 
युसुफ अली हे अब्जाधीश व्यापारी आहेत. LuLu ग्रुप इंटरनॅशनलचे ते प्रमुख आहेत. जगप्रसिद्ध LuLu मॉल चेनचे याच ग्रुपचा भाग आहे. जगभरात विशेषतः आखाती देशात त्यांचे  दोनशेहून अधिक स्टोअर्स आहेत. त्यांची कंपनी भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना रोजगार देण्यासाठी ओळखली जाते. २०१८ मध्ये, फोर्ब्स मिडल इस्टने त्यांना अरब जगतातील पहिल्या क्रमांकाचे भारतीय व्यापारी म्हणून सन्मानित केले आहे.

 
युसुफ अलींचा व्यवसाय आणि समाजकार्य 
युसूफ अली यांनी भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणुकी केल्या आहेत. त्यांनी केरळमध्ये लुलू कन्व्हेन्शन सेंटर आणि हॉटेल चालू केले आहेत. त्याचबरोबर अनेक बँकांमध्ये त्यांनी स्टेक ही खरेदी केले आहेत. अली यांनी कोची, लखनौ आणि बेंगळुरूमध्ये मॉल उघडून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.

युसुफ अली पैशासोबतच मनानेही श्रीमंत आहेत. विविध सामाजिक कार्यामध्येही ते अग्रेसर असतात. मायभूमी केरळसह देशभरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. यापूर्वीही अनेक गरजवंतांना त्यांनी मोठी मदत केली आहे. याचच एक उदाहरण म्हणजे कुवेत मधील प्रसंग.

काही दिवसांपूर्वी कुवेतमध्ये एका सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला. तेव्हा या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या कुटुंबीयांसाठी युसुफ अली यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. 

युसुफ अली यांच असं मदतीला धावून जाणं समाजापुढे माणुसकीचा मोठा आदर्श निर्माण करत आहे. त्यांच्या या कार्यास आवाज मराठीकडून सलाम आणि पुढे ही त्यांनी असेच कार्य करावे यासाठी शुभेच्छा! 
 
-प्रज्ञा शिंदे

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter