मालेगावमध्ये 'इंडियन सेक्युलर पार्टी'च्या स्थापनेने बदलणार राजकीय समीकरणे?

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 12 d ago
इंडियन सेक्युलर पार्टीची स्थापना करताना माजी आमदार आसिफ शेख
इंडियन सेक्युलर पार्टीची स्थापना करताना माजी आमदार आसिफ शेख

 

निवडणुकांच्या काळात नवीन राजकीय समीकरणांची आणि बरेचदा तर नव्या राजकीय पक्षांची घोषणा होत असते. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या धरतीवर राजकारण तापले आहे. राज्यात सध्या तीन आघाड्या निवडणूक लढवत आहेत. यामध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांची तिसरी आघाडीचा समावेश आहे.  

दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडवर गेल्या दोन महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी ‘इंडियन सेक्युलर पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.  

आवाज मराठीने माजी आमदार आसिफ यांच्याशी संपर्क साधला असता ते पक्ष स्थापनेविषयी बोलताना म्हणतात, “ मी पूर्वी काँग्रेसमध्ये होतो. त्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पूर्वीपासूनच मी पुरोगामी विचार घेऊन समाजकारण आणि राजकारण करत आहे. या दोन्ही पार्टींमध्ये काम केल्यानंतर मला असे समजले की, कोणतीही राजकीय पार्टी अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाच्या हितासाठी, त्यांचे जीवनमान बदलण्यासाठी उत्सुक नाही. मुस्लिम सर्वच दृष्टीने मागास राहिला आहे. याशिवाय  मुस्लिमांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत.” 

पुढे ते म्हणतात, “ राज्याच्या विधिमंडळात जर मुस्लिमांसाठी आवाज उठवायचा असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात असणे अत्यंत आवश्यक आहे. मुस्लिम प्रतिनिधी जेव्हा दुसऱ्या पक्षात काम करतो तेव्हा त्याच्यावर पक्षाचे दडपण असते. यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता मुस्लिमांचे प्रश्न ठोसपणे मांडताना दिसत नाही. अल्पसंख्यांकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी ‘इंडियन सेक्युलर पार्टी’ हा पक्ष स्थापन केला. भारतीय निवडणूक आयोगाकडे आम्ही पक्षाची अधिकृत नोंदणी केली आहे. सर्व जाती समुदायातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारा हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या पक्षाच्या माध्यमातून मी अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिमांचे प्रश्न सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.” 

याविषयी बोलताना स्थानिक पत्रकार आणि राजकीय घडामोडींचे अभ्यासक जलील शेख म्हणतात, “ आसिफ शेख यांनी सुरुवातीला इस्लाम या नावाने पक्षाची स्थापना केली होती. यासंदर्भात माध्यमांमध्ये बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. इस्लाम पक्षावर चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. यानंतर मालेगाव शहरातील मुस्लिम धर्मगुरूंनी आसिफ शेख यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर आसिफ शेख यांनी पक्षाचे इस्लाम हे नाव बदलत ‘इंडियन सेक्युलर पार्टी’ असे नाव दिले.” 

‘इंडियन सेक्युलर पार्टी’ पक्षाचे संस्थापक आसिफ शेख कोण 
इस्लाम पक्षाचे संस्थापक आसिफ शेख हे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिले आहेत. आसिफ यांनी पहिल्यांदा २०१४ मध्ये कॉँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी मौलाना मुफ्ती यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती यांनी त्यांचा प्रभाव केला होता.   

आसिफ यांनी २०२१ मध्ये कॉँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडल्यानंतर आसिफ यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या महिन्यात शरद पवारांची साथ सोडून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती.  
 
या मुद्द्यांवर निवडणूक लढणार - आसिफ शेख 
प्रत्येक पक्ष आणि त्या पक्षाचे उमेदवार काही विशिष्ट मुद्यांवर निवडणूका लढवत असतात. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंडियन सेक्युलर पार्टीकडून मालेगाव मध्य ही एकमेव  जागा लढवण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे संस्थापक आसिफ शेख उमेदवार असणार आहेत. कोणत्या मुद्यांवर निवडणूक लढवणार असे विचारले असता ते म्हणतात, “ मालेगावचा सर्वांगीण विकास हाच आमचा मुख्य अजेंडा असून आम्ही त्या दृष्टीने काम करत आहोत. सक्रिय राजकारणात काम करत असताना केलेल्या विविध विकासकामांवर ही निवडणूक मी लढवणार आहे. मालेगाव शहराचा विकास करण्यासाठी माझ्या वडिलांप्रमाणेच मी देखील मोठे योगदान दिले आहे.” 

पुढे ते म्हणतात, “ राज्यातील प्रस्थापित मंडळीच सरकारमध्ये असतात. ते फक्त मुस्लिमांसाठी कोणतीही तरतूद सरकार करत नाहीत. यामुळे येत्या काळात मतदारसंघातील जनतेच्या आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजातील घटकांच्या विकासासाठी मी आवाज उठवणार आहे. काही मंडळी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी विविध जाती धर्मावर विशेषतः मुस्लिम धर्मावर, प्रेषितांवर अभद्र भाषेत बोलतात. कोणत्याही जाती धर्मावर बोलण्याची आपली संस्कृतीही नाही आणि आपला अधिकार देखील नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात कायदा करण्याची मागणी देखील मी करणार आहे. याशिवाय मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात कोर्टाने दिलेले पाच टक्के आरक्षण लवकरात लवकर लागू करण्यासाठी काम करणार आहे.” 

निवडणुकांमध्ये पक्षाची पायाभरणी आणि संघटनात्मक कार्य महत्वाची भूमिका बजावते. इंडियन सेक्युलर पार्टीची मोर्चेबांधणी करण्याविषयी बोलताना आसिफ शेख म्हणतात, “ सध्या तरी आमचा पक्ष ही फक्त मालेगाव मध्यची विधानसभा लढवणार आहे. आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. माझे आणि पक्षाचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. राज्यातील विधानसभा पार पडल्यानंतर पक्षाची पुढील मोर्चेबांधणी आम्ही करणार आहोत. राज्यभरात फिरून पक्षाचे काम करणार आहोत. तसेच आगामी काळात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्यावर लक्ष देणार आहोत. यासाठी महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे.” 

आसिफ शेख यांनी केलेली महत्वाची कार्य 
मालेगावमध्ये आसिफ शेख यांना मोठा जनाधार आहे. त्याठिकानच्या लोकप्रिय नेत्यांपैकी आसिफ शेख एक आहेत. मालेगावच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या मदतीने त्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये एक उर्दू घर बांधले आहे. तसेच मतदारसंघात शिक्षणाचा टक्का वाढावा आणि  गरीब कुटुंबातील  मुलांना शिक्षण मिळावे यासाठी गेल्या पाच वर्षांपासून मोफत पुस्तकांचे वाटप करत आहे. याशिवाय मालेगावच्या विकासाच्यादृष्टीने मतदारसंघात त्यांनी २५ कोटी रुपयांचे उड्डाणपूल देखील बांधले आहेत.

मालेगावची निवडणूक बहुरंगी होणार 
महाराष्ट्रात जवळपास ११.५६  टक्के मतदार हे मुस्लिम आहेत. २८८ विधानसभा मतदारसंघातील ३८ मतदारसंघात मुस्लिम मते निर्णायक ठरतात. मालेगाव मध्य या मतदारसंघात हमखास मुस्लिम उमेदवार निवडून येतो. मालेगाव मध्य या विधानसभेत आणखी एका पक्षाची एन्ट्री झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.  

आसिफ शेख हे यंदाची विधानसभा निवडणूक इस्लाम या पक्षाकडून लडवणार आहेत. एमआयएम पक्षाचे मौलाना मुफ्ती हे मालेगाव मध्यचे सध्याचे आमदार आहेत. तर समाजवादी पक्षाकडून शान-ए-हिंद या निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे एजाज बेग यांच्यासह एकूण १६ जण निवडणूक लढवणार आहेत. महायुतीने याठिकाणी उमेदवार दिला नसल्याने महायुतीविना येथे निवडणुक होणार आहेत. यामुळे मालेगाव मध्यची निवडणूक बहुरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच याठिकाणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा दौरा झाला. दौऱ्यावेळी त्यांनी पाच वेळा आमदार राहिलेले निहाल अहमद यांची मुलगी शान-ए हिंद यांना तिकीट जाहीर केले आहे. तर कॉँग्रेसकडून एजाज बेग हे मालेगाव मध्यची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत.  
      
मालेगाव मध्य मतदारसंघ हा मुस्लिम बहूल भाग म्हणून ओळखला जातो. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आसिफ शेख यांच्या पक्षामुळे राजकारणात आणखी एका पक्षाची एंट्री झाली आहे. यामुळे यंदाची निवडणूक अजून रंगतदार होणार यात शंका नाही. मात्र इंडियन सेक्युलर पार्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार का आणि जनता या पक्षाला स्वीकारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter