व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉपवर 'यामुळे' सायबर हल्ल्याचा धोका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भारताच्या सायबर सुरक्षा यंत्रणेने (CERT-In) व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप वापरणाऱ्या विंडोज युजर्सना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या जुन्या व्हर्जनमध्ये मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे सायबर हल्लेखोर सहज तुमच्या कॉम्प्युटरवर हल्ला करू शकतात किंवा तुमची माहिती चोरू शकतात. 

हा धोका व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉपच्या 2.2450.6 पेक्षा जुन्या व्हर्जन वापरणाऱ्या विंडोज युजर्सना आहे. CERT-In च्या म्हणण्यानुसार, जुन्या व्हर्जनमधील ही चूक फाइल्स आणि त्यांच्या प्रकारामध्ये गडबड झाल्यामुळे आली आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या फाइल्स नीट हाताळल्या जात नाहीत. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली चुकीची फाइल उघडली, तर हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटरवर काहीही करू शकतात. या त्रुटीला CVE-2025-30401 असे नाव देण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज, कॉल आणि फोटो-व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजर्सना याचा धोका जास्त आहे.

CERT-In ने सांगितलं की, हॅकर्स या चुकीचा फायदा घेऊन तुमची खाजगी माहिती चोरू शकतात.तसेच तुमचा कॉम्प्युटर पूर्णपणे हॅक करू शकतात. हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅप वर खराब फाइल्स पाठवू शकतात. तुम्ही त्या फाइल्स उघडल्या, तर कॉम्प्युटर पूर्णपणे हॅक होऊ शकतो.    

भारतात करोडो लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मेसेज, कॉल आणि कामासाठी करतात. त्यामुळे अशा चुकीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. CERT-In ने युजर्सना ही गोष्ट गांभीर्याने घेण्यास सांगितलं आहे.

काय कराल
  • तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉपचं व्हर्जन तपासा. हे व्हर्जन 2.2450.6 पेक्षा जुने असेल तर नवीन व्हर्जन अपडेट करा.  
  • व्हॉट्सअ‍ॅपने ही चूक दुरुस्त केली आहे. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.whatsapp.com/security/advisories/2025) जाऊन माहिती पाहू शकता.  
  • व्हॉट्सअ‍ॅप येणाऱ्या अनोळखी किंवा संशयास्पद फाइल्स उघडू नका. 
  • नेहमी सॉफ्टवेअर अपडेट करत रहा आणि सायबर सुरक्षेच्या साध्या गोष्टी पाळा.

व्हॉट्सअ‍ॅप सारख्या लोकप्रिय अॅपमध्ये अशी चूक होणं ही सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं मोठी बाब आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅप वर सुमारे ५३५.८ दशलक्ष लोक आहेत. अशा चुकीमुळे खाजगी माहिती, बँक खात्यांचा तपशील किंवा महत्त्वाची कागदपत्रं धोक्यात येऊ शकतात. अलीकडे सायबर हल्ले वाढत आहेत. सायबर सुरक्षेची माहिती नसणाऱ्या नागरिकांना अशा हल्ल्यांचा धोका अधिक आहे. त्यामुळे इशाऱ्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter