मुर्शिदाबाद हिंसाचारानंतर तणावपूर्ण शांतता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याविरोधात मुर्शिदाबाद येथे नव्याने हिंसाचार उफाळून नये यासाठी सुरक्षा यंत्रणांनी येथे कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, राज्य सशस्त्र पोलिस दल आणि जलद कृती दलाच्या जवानांच्या तुकड्या जंगीपूर, धुलियान, सुती आणि समशेरगंज येथे तैनात करण्यात आल्या असून याठिकाणी मागील ४८ तासांत कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही, अशी माहिती मंगळवारी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

मुर्शिदाबाद येथील ज्या भागात हिंसाचार उसळला होता, त्या भागात आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून हिंसारामुळे येथून स्थलांतर केलेले नागरिक परतू लागले असून, येथील दुकारही पुन्हा उघडण्यात येऊ लागली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. "हिंसाचारामुळे या भागातून स्थलांतरित झालेले नागरिक आता हळूहळू येथे परतू लागले आहेत. त्यांना राज्यप्रशासनाच्या वतीने साहाय्य केले जात आहे," असा दावा तृणमूल काँग्रेसचे जंगीपूरचे खासदार खलिलूर रहमान यांनी केला. 

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासन पीडितांची यादी करत असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

नियंत्रणासाठी एकत्रितपणे गस्त 
मुर्शिदाबाद जिल्ह्यात मागील शनिवार आणि रविवारी उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तुकडीने मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सुती, समशेरगंज आणि धूलियन या अल्पसंख्याकबहुल भागांना भेट दिली. या तुकडीचे नेतृत्त्व बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक रवी गांधी यांनी केले. गांधी यांनी सांगितले की, "राज्यातील पोलिसांबरोबर समन्वय साधून हिंसाचारग्रस्त भागात एकत्रितपणे गस्त वाढविण्यात येणार आहे." 

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २१० जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातही सोमवारी वक्फ कायद्याविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला होता मात्र, येथील महामार्गावरील वाहतूक सुरळीत होती, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.