परतीचा पाऊस आज पुन्हा बरसणार?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. काल रविवारी काही भागात पावसाचा जोर ओसरला होता. आज पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे या भागातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईसह उपनगर, मराठवाडा तसेच विदर्भातही पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्या आज सोमवारी पाऊस पडणार आहे. त्यामुळे बळीराजाने काढणीला आलेली खरीप हंगामातील पिके शक्यतो झाकून ठेवावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस परतीचा पाऊस सुरु झाला होता. सलग चार दिवस पाऊस कोसळल्यानंतर ऑक्टोबरमध्ये मौसमी वाऱ्यांची चाल थबकली होती. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढ्याने कमाल तापमान ३६ अंशांपार गेले. आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, काल रविवारी (ता. १३) २४ तासांमध्ये परभणी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे ३१.६, जळगाव ३१.८, नाशिक ३०.६, सातारा ३१.२, अकोला ३२.८, तसेच नागपूर ३३.० तापमानाची नोंद करण्यात आली. यामध्ये आणखीच घट होण्याची शक्यता आहे.

कारण, परतीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत मौसमी वाऱ्यांची आणखी माघार होण्याचा अंदाज आहे. परिणामी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आज (ता. १४) कोकणातील पालघर, ठाणे, उत्तर महाराष्ट्र धुळे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.