रायपूर येथील राष्ट्रपती ध्वजप्रदान कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय मंत्री. अमित शाह
छत्तीसगडमधील नक्षलवाद ३१ मार्च २०२६च्या आत पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि छत्तीसगड सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी रायपूर येथे राष्ट्रपती ध्वजप्रदान कार्यक्रमात बोलताना केले. "जेव्हा छत्तीसगड पूर्णपणे नक्षलवाद मुक्त होईल तेव्हा संपूर्ण देशही नक्षलवादाच्या विळख्यातून पूर्णपणे सुटेल असे शहा म्हणाले.
मागील वर्षभरात छत्तीसगडमधील पोलिसांनी नक्षलवादाविरोधात महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून, छत्तीसगड सरकारनेदेखील नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे, असे मत शहा यांनी यावेळी व्यक्त केले. "छत्तीसगड पोलिस त्यांच्यावर असलेली जवाबदारी योग्यपद्धतीने पार पाडतील आणि योग्य ते कर्तव्य बजावताना कधीही मागे फिरणार नाहीत," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शहांच्या भाषणातील काही मुद्दे
■ मागील वर्षभरात २८७ नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात आला तर एक हजार जणांना अटक करण्यात आली
■ मागील वर्षभरात ८३७ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली
■ मागील चार दशकांत पहिल्यांदाच नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची आणि जवानांची संख्या १००च्या आत आहे
■ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मूळ प्रवाहात सहभागी व्हावे आणि देशाच्या विकासात हातभार लावावा