'वक्फ'चा वापर मुस्लिम समुदायाच्या सक्षमीकरणासाठी केला जाईल - अल्पसंख्याक मंत्री रिजिजू

Story by  Sameer D. Shaikh | Published by  Fazal Pathan • 8 d ago
 पुस्तकाचे प्रकाशन करताना अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू
पुस्तकाचे प्रकाशन करताना अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू

 

"वक्फ मालमत्तेचा वापर शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याणासाठी केला जाईल. मुस्लिम समुदायाच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे", असे मत अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू  यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते नुकतेच 'Waqf Bill 2024: Repsect for Islam and gift for Muslims' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वक्फ व्यवस्थेतील आव्हाने आणि वक्फ विधेयक २०२४ मधील प्रस्तावित सुधारणा यांविषयी जनजागृती करणारे हे पुस्तक आहे.

या पुस्तकात 'उमीद कायदा' (युनायटेड वक्फ ॲक्ट फॉर मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशिएन्सी अँड डेव्हलपमेंट) ची प्रशंसा केली आहे. या कायद्याद्वारे वक्फ मालमत्तेचे कार्यक्षम व्यवस्थापन, डिजिटल रेकॉर्ड-कीपिंग आणि थर्ड पार्टी ऑडिटची प्रक्रिया मांडण्यात आली आहे. वक्फ बोर्डात पारदर्शकता आणणे, वक्फ मालमत्तेचा सुयोग्य वापर करणे आणि समाजातील अतिसंवेदनशील घटकांना त्यांचा लाभ मिळवून देणे या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत.

"वक्फ सुधारणांसाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरणार असल्याचे किरेन रिजिजू यांनी म्हटले. हे पुस्तक केवळ वक्फ सुधारणांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत नाही तर समाजात न्याय, समानता आणि सर्वांगीण विकासाची भावना देखील वाढवते", अशी पुस्ती त्यांनी यावेळी जोडली. पुस्तकामध्ये डॉ. शाहिद अख्तर, डॉ. शालिनी अली, शिराज कुरेशी, शाहिद सय्यद आदींचे अभ्यासपूर्ण लेख आहेत.

"वक्फ हा केवळ धार्मिक ट्रस्ट नसून सर्वसमावेशक आणि न्याय्य विकासाला चालना देणारी राष्ट्रीय संपत्ती म्हणून काम करू शकते यावरही पुस्तकात भर देण्यात आला आहे. या पुस्तकामुळे वक्फबाबत जागरूकता वाढेल आणि वक्फ व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील", असेही रिजिजू म्हणाले.

किरेन रिजिजू यांनी हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा देणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, "हे व्यासपीठ मुस्लिम समाजामध्ये जनजागृती करत आहे. समाजात एकता आणि सौहार्द वाढवण्यासाठी ही कृती अत्यंत आवश्यक आहे."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter