ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआईएमपीएलबी) वक्फ संशोधन विधेयकासंदर्भात आणखी विरोध वाढण्यापूर्वी हे सुधारित विधेयक संसदेत मांडले जाऊ शकते. या विधेयकावर काम करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सोमवारी सांगितले की, हे विधेयक संसदेत पारित होईल. हे विधेयक कोणत्याही धमक्यांमुळे थांबणार नाही.
भाजपाचे प्रमुख सहयोगी टीडीपी आणि जेडी(यू) वर दबाव आणण्यासाठी बोर्डाने १३ मार्च रोजी जंतर-मंतरवर विरोध प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षांना पत्र पाठवले जात आहेत.
हे विधेयक पारित झाले तर देशभरात आंदोलन सुरू करू असा इशारा देखील बोर्डाने दिला आहे. तसेच बोर्डाने सांगितले की आम्ही या विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्हाला त्याठिकाणी न्याय मिळेल.
जगदंबिका पाल म्हणाले, "सर्वोच्च न्यायालय नेहमीच एक पर्याय आहे. पण लोकशाहीला धमक्यांमुळे किंवा लोकांच्या इच्छेनुसार चालवले जाऊ नये. कायदा निवडलेल्या प्रतिनिधींकडून बनवला जातो, धमक्या किंवा हिंसक वक्तव्यांमधून नाही."
त्यांनी एआईएमपीएलबी च्या दृष्टिकोनातील विरोधाभासावर देखील टीका केली. ते म्हणाले बोर्ड एकीकडे कारवाईची धमकी देत आहेत आणि दुसरीकडे कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याची मागणी करतात. पाल यांनी सरकारच्या दृष्टिकोनाचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की वक्फ विधेयकावर जेपीसीने विस्तृत विचार-विनिमय आणि सखोल तपासणी केल्यानंतरच या विधेयकासंदर्भातील निर्णय घेतला आहे.
पाल म्हणाले, "आम्ही सहा महिने एआईएमपीएलबीचे मत ऐकले आणि त्यांना त्यांची मते मांडण्यासाठी चार तास दिले. देशातील अल्पसंख्यकांच्या गरजांना संबोधित करणारे ४०० पानांचे संशोधन आम्ही तयार केले आहे. या विधेयकाचा उद्देश दुर्बल गटांचा, गरीब, महिला, अनाथ, विधवा आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुस्लिम बांधवांना मदत करणे आणि त्यांनी पाठिंबा देणे आहे.”
पाल यांच्या मते, या विधेयकातील सुधारणा त्या लोकांना फायदा देतील ज्यांना याची सर्वाधिक आवश्यकता आहे. मुस्लिम समुदायासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांनी स्पष्ट केले की हे विधेयक पारित करण्याची प्रक्रिया कोणत्याही धमक्यांमुळे रोखली जाणार नाही.
दरम्यान, जमीयत उलेमा-ए-हिंद ने एआईएमपीएलबी च्या विरोधाला आपले समर्थन दिले आहे. त्यांनी सरकारवर मुसलमानांना त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरायला भाग पाडल्याचा आरोप केला आहे. जमीयत प्रमुख मौलाना अरशद मदनी यांनी १३ मार्च रोजी जंतर-मंतरवर होणाऱ्या विरोध प्रदर्शनाशी एकजूट दाखवताना म्हटले की, मुसलमानांना त्यांच्या हक्कांसाठी लढायला भाग पाडले जात आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter