मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 8 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून, जिरीबाम जिल्ह्यामध्ये शनिवारी झालेल्या ताज्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे सुरक्षा दलांनी चुराचांदपूर जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचे बंकर उद्‍ध्वस्त केले.
 
या भागाला लागून असलेल्या विष्णूपूरमध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी रॉकेटच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर अन्य सहाजण जखमी झाले होते. राज्यातील मैतेई- कुकी समुदायामध्ये पुन्हा एकदा वैमनस्य उफाळून आले असून दोन समुदायांतील सशस्त्र गट परस्परांवर हल्ले करत आहेत.

काही अज्ञात दहशतवाद्यांनी एका व्यक्तीचा शनिवारी झोपेतच गोळ्या घालून खून केला होता तर अन्य चौघाजणांचा जिरीबाम जिल्ह्यात विविध ठिकाणांवर झालेल्या हिंसाचारात मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या हिंसाचारातील मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती स्थानिक अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. येथील स्थानिक मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमध्ये हा रक्तरंजित संघर्ष झाल्याचे बोलले जाते. या हिंसाचाराची तीव्रता लक्षात घेता मृतांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.

शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न
मणिपूर रायफल्सच्या मुख्यालयावर शुक्रवारी दहशतवाद्यांनी हल्ला करत शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला होता. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. या गोळीबारामध्ये पाचजण जखमी झाले होते. हिंसाचाराची तीव्रता वाढत असल्याने राज्यातील शाळांना सुटी देण्यात आली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter