महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगत आहेत. तर राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी देखील मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जात आहे.
मविआ आणि महायुती यांच्यानंतर राज्यात सर्वाधिक उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिले आहेत. वंचितचे १९९ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यापैकी ९४ उमेदवार बौद्ध, २३ उमेदवार मुस्लीम, १७ उमेदवार इतर मागासवर्गीय आणि १५ उमेदवार भटके विमुक्त गटातील आहेत. नांदेड दक्षिणमध्ये फारुख अहमद यांच्या प्रचार दौऱ्यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे नांदेड शहरात होते. यानिमित्त ‘आवाज मराठी’ने त्यांच्यासोबत साधलेला हा संवाद…
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘युवा नेतृत्व’
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि यावेळी निवडणुकीत पक्षांची धुरा युवा नेत्यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे चित्र सर्वच पक्षात पाहायला मिळते. या युवा नेतृत्वाविषयी विचारले असता सुजात आंबेडकर म्हणतात, “आत्ताच्या राजकारणात युवा नेते एंट्री करतायेत, त्यांना नेता म्हणणं ही गोष्टी मला चुकीची वाटते. आमदार, खासदार आणि प्रस्थापितांची पोरं उभी राहणार आणि तिच निवडूनही येणार. उदाहरण द्यायचं झालं तर, नांदेडमध्ये आत्ता तिसरी पिढी निवडणुकीला उभी आहे. हेच चित्र लातूर, बारामती आणि इतर ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतं. आणि याच गोष्टीला माझा विरोध आहे.”
खऱ्या युवा नेतृत्वाविषयी ते पुढे म्हणतात, “तरुणांचे राजकीय नेतृत्व आंदोलनांमधून आणि चळवळीतून यायला हवं. सामाजिक न्यायासाठी आंदोलने करणे, विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे यांसारख्या प्रक्रियेतून आलेले आणि युवक उचलून धरतील ती खरी लिडरशिप म्हणावी लागेल. परंतु आत्ता प्रस्थापितांच्या राजकारणातून खऱ्या युवा नेतृत्वाचा गळा घोटला जातोय.”
विचारधारेशी फारकत घेणारे महाराष्ट्राचे राजकारण
महराष्ट्रात मातब्बर राजकीय नेते आजवरची राजकीय विचारधारा सोडून एका रात्रीत टोकाच्या विरोधी विचारधारा पाळणाऱ्या पक्षांच्या गोटात जाऊन बसत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर यात मोठी वाढ झाली. त्याबद्दल विचारले असता सुजात आंबेडकर म्हणाले, “महाराष्ट्रात विचारांचे राजकारण होत नाही हे २०१९ च्या निवडणुकीपासून आम्ही लोकांना सांगत होतो. नेतेरातोरात पक्ष बदलतात. हे त्यांना पक्षाची विचारधारा पटली म्हणून नव्हे तर, स्वतःच्या जमिनी, कारखाने आणि शिक्षणसंस्था सुरक्षित राहाव्यात यासाठी.. सत्तेचा उपयोग ते स्वतःची प्रॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठी करतात.”
विचार्धारेविषयी सुजात आंबेडकर म्हणतात, “या लोकांना कधीही विचारधारेशी देणेघेणे नव्हते आणि ते आजही नाहीये. स्वतःची भूमिका मांडण्यासाठी ते मीडियासमोर विचारधारेचे तुणतुणे निवडणुकीपुरते वाजवतात. पक्षातून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच संपत्ती वाचवण्यासाठी ते शून्य मिनिटात दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. याउलट दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी पक्षाकडे पाहिले तर लक्षात येईल की २०१९ मध्ये पक्षाची जी भूमिका होती तीच आजही आहे. २०१९च्या जाहीरनाम्यातील आमचे बरेचसे मुद्दे आजही तसेच आहेत आणि तेही विचारधारा न बदलता.”
मुस्लीम उमेदवारांना संधी
वंचितने विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजे तब्बल ९४ उमेदवार बौद्ध दिले आहेत. त्यानंतरवंचितने मुस्लीम उमेदवारांना प्राधान्य देत २३ जणांना उमेदवारी दिली आहे. त्यासोबतच ओबीसींनाही उमेदवारी देत त्यांनी ‘बौद्ध-मुस्लीम-ओबीसी’ असे नवे समीकरण तयार केले आहे. मुस्लीम समाजाला इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यामागची वंचितची भूमिका विचारली असता सुजात सांगतात, “आत्तापर्यंत कॉंग्रेसने मुस्लिमांचा वापर फक्त वोटबँक म्हणून केला आहे. मुस्लीम समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुबळा असल्याचे सच्चर कमिटीच्या रिपोर्टमुळे सिद्ध झाले आहे.”
वंचित बहुजन आघाडीने २०हून अधिक मुस्लीम उमेदवारांना उमेदवारी दिली असली तरीही लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लीम समाजाने वंचितला नाकारून महाविकास आघाडीला पसंती दिली होती. याविषयी विचारले असता सुजात सांगतात, “महाराष्ट्राच्या जनसंख्येत १२% मुस्लीम आहेत. तरीही त्यांना लोकसभेत योग्य प्रमाणात मुस्लीम प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यावेळी महाविकास आघाडीने सुद्धा एकही मुस्लीम उमेदवार उभा केला नव्हता. लोकसभा निवडणुकांच्या वेळी कॉंग्रेसने मुस्लीम उमेदवारांना सरळ-सरळ फसवले होते. हे आत्ता मुस्लिमांच्या बोलण्यातून सुद्धा जाणवत आहे. मुस्लिमांनी मविआला मतदान केले तरीही आमच्या समाजाला एवढ्या कमी उमेदवारी का दिल्या गेल्या याविषयी मुस्लीम समाजाकडून मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहे.
ते पुढे म्हणतात, "विशाळगडसारख्या प्रकरणावर मविआचे नेते काहीच बोलले नाहीत. वक्फ बोर्डाच्या जमिनी धोक्यात असताना मविआच्या नेत्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. कॉंग्रेसने देशावर ७० वर्षे राज्य केले. तेव्हापासून त्यांनी मुस्लीम समाजाला योग्य प्रतिनिधित्व दिले असते तर आत्ता चर्चा करण्याची वेळच आली नसती. त्यामुळे मुस्लिम समाज आता हक्काचा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे पाहात आहे..”
सुजात पुढे म्हणतात, “ज्यांच्यासाठी सत्तेची दारे नेहमी बंद राहिली, तो वंचित समाज सत्तेत गेला आणि त्यांनी स्वतःच्या समाजाच्या उन्नतीसाठी काम केले तर त्या समाजाची परिस्थिती रातोरात बदलताना आपल्याला दिसेल. हाच विचार करून या विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितने अधिकाधिक मुस्लिमांना उमेदवारी देण्याचे ठरवले.”
मुस्लीम मतदारामध्ये सामाजिक आणि राजकीय साक्षरता कमी आहे, मागासलेपण आहे का, तो नवीन पर्याय तपासण्याऐवजी पारंपारिक पक्षांनाच मतदान करण्याला पसंती देतो का, असे विचारले असता सुजात आंबेडकर ही बाब अमान्य करत म्हणतात, “मुस्लीम मतदार खूप जागरूक आणि सजग आहेत. इतर समाजांपेक्षा मुस्लीम मतदार खूप विचारपूर्वक मतदान करतो. हा मुस्लीम समाज शिक्षणाच्या बाबतीत जागरूक आहे का, ही चर्चा करण्याआधी आपण यावर विचार केला पाहिजे की येथील राज्यकर्त्यांनी मुस्लिमांना किती वंचित ठेवले आहे. मुस्लिमांना सुरुवातीपासूनच इतर समाजाप्रमाणे समान पातळीवर ठेवले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती.”
मुस्लिम आरक्षणाबद्दल वंचितची भूमिका
मुस्लीम आरक्षणाबद्दल मत विचारले असता सुजात आंबेडकर म्हणतात, “वंचित बहुजन आघाडीच्या जोशाबा (जोतिबा, शाहू, बाबासाहेब) समतापत्रामध्ये आम्ही सरळ सरळ म्हटले आहे की मुस्लिमांना शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी ५% आरक्षण देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करेल. निवडनुकांनंतर जर आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत आलो तर जो वंचितांचे प्रश्न मांडेल त्याला आम्ही साथ देऊ.”
काय आहे वंचितचा अजेंडा
वंचितच्या निवडणूक अजेंड्यावर ते पुढे म्हणतात, “वंचितांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देणे. शेतकऱ्यांसाठी एमएसपी लागू करणे, त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव देणे यांसाठी आम्ही वचनबद्ध अहोती. महाराष्ट्रातील बंद पडलेल्या एमआयडीसींचे पुनर्वसन करून आम्ही एक कोटी युवकांना रोजगार निर्मिती करून देऊ शकतो. पन्नास हजार पेक्षा जास्त ओबीसी, एससी आणि एनटीसाठी असलेली पदे रिक्त आहेत, ती भरण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करू शकते. महत्वाचे म्हणजे ५% मुस्लिमांचे आरक्षण आणि येथील बहुजनांच्या आरक्षणाला जो हाथ लावणार नाही… या मागण्या जे सरकार मान्य करेल त्यांच्यासोबत आम्ही जाणार. परंतु अशी वेळ येणार नाही, कारण वंचित स्वबळावर लढतेय आणि इतर मोठ्या पक्षांना आम्ही आमच्या अजेंड्यावर झुकवू ही आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित करेल…
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरून केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात तणाव नर्माण झाला होता. राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना सुजात म्हणतात, “राज ठाकरेंचे भोंगे उतरवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या युवक कार्यकर्त्यांनी २०२२ मध्येच केले होते. जर राज ठाकरेंनी परत मशिदींवरती आक्षेपार्ह विधाने केली तर वंचित बहुजन आघाडी पुन्हा त्यांना पुन्हा अडवेल.”
कोणता पक्ष ठरणार किंगमेकर
निवडणुकांनंतर लहान पक्ष भूमिका बजावणार असे काही राजकीय अभ्यासकांचे मत आहे.. वेळ पडल्यास किंगमेकरची भूमीका बजावणार का असे विचारले असता सुजात म्हणतात, “निवडणुकांमध्ये किंगमेकर कोण होणार यापेक्षा जे आमदार निवडून जातील आणि सत्ता स्थापन करतील ते कोण असणार आहेत हे महत्वाचे आहे. महराष्ट्रातील तिच २५ कुटुंबं आणि त्याच कुटुंबांतून येणारे २८८ आमदार यांच्याभोवतीच सत्तेचं साटलोट झालं तर तो एकचं माणूस किंगमेकर ठरेल. परंतु ज्या लोकांसाठी आजपर्यंत सत्तेची दारेच उघडली नाहीत तीच लोकं जर सत्तेत आली तर लक्षात येईल की जनताच किंगमेकर ठरतेय आणि हेच सुदृढ लोकशाहीचे प्रतिक ठरेल.”
आर्टीच्या स्थापनेवर प्रतिक्रिया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर आता अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात येणार आहे. याविषयी बोलताना सुजात आंबेडकर म्हणतात, “दोन समाजांना विभागून त्यावर राजकारण करणे हे येथील प्रस्थापितांचे नेहमीचेच काम आहे. आत्ता बार्टी पासून आर्टी वेगळी केली असली तरी इथल्या सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे की बार्टी खरंच व्यवस्थित काम करत होती का?”
याविषयी बोलताना ते पुढे म्हणतात, “२०१७ पासून ते २०२४ पर्यंत बार्टीच्या सगळ्या शिष्यवृत्या थांबवलेल्या आहेत. त्यामुळे कितीतरी PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले आहे. यावरून लक्षात येते की बार्टी व्यवस्थित काम करत नव्हती. या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), महाराष्ट्र सरकार किंवा समाज कल्याण खात्याकडून आर्थिक पुरवठा होत नव्हता. त्यामुळे आता वेगळी संस्था काढण्यापेक्षा आहे त्या संस्थाकार्यक्षम करा. आर्टीमुळे जर मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळत असेल आणि त्यातून त्याचं भलं होणार असेल तर त्यात वाईट काही नाही. परंतु नवीन संस्था सुरु करण्यापेक्षा बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या संस्थावर आधी लक्ष द्या.”
मुस्लीम समाजाचे प्रश्न, त्याविषयीची एकूणच राजकीय अनास्था, या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्यामागची वंचितची भूमिका, त्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्धता याबाबत वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी कोणतेही आढेवेढे न घेता अतिशय स्पष्टपणे प्रश्नांना उत्तरे दिली. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे राजकारण बरेच बदलले आहे. पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने मुस्लिम मतदार हे महायुती आणि मविआवर नाराज आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक मुस्लिम उमेदवार दिले असल्याने, मुस्लीम समाज वंचितकडे नवा पर्याय म्हणून पाहतोय का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शब्दांकन : भक्ती चाळक