फजल पठाण
नुकतीच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. देशाचे लक्ष लागले आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे. राज्यात एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. २० नोव्हेंबरला मतदान होईल तर २३ नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहे.
निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. विविध पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. येत्या दिवसांमध्ये विविध पक्ष उमेदवारांच्या घोषणांचा सोपस्कार पार पाडतील. एव्हाना काही पक्षांनी उमेदवार निवडीत आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.२१ सप्टेंबर दरम्यान वंचितने त्यांची प हिल्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये वंचितने रावेर विधानसभा मतदारसंघातून शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शमिभा या तृतीयपंथिय समाजातून येतात. शमिभा पाटील यांना उमेदवारी देत वंचित बहुजन आघडी राजकीय चर्चांचा केंद्रबिंदु ठरली होती. नुकतेच ९ ऑक्टोबर ला वंचितने विधानसभा निवडणुकीसाठी आणखी १० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतील सर्व उमेदवार हे मुस्लिम आहेत. या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा पहायला मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित स्वबळावर लढली होती. आता विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी स्वबळाचा नारा देणार असल्याचे दिसत आहे. याविषयी आवाज मराठीशी बोलताना सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक उबेद बाहुसेन म्हणतात, “ लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक असते. हे प्रतिनिधित्व ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंतच्या निवडणुकीतून मिळते. मात्र समाजातील इतर घटकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम समाजाला मिळालेले अत्यंत कमी प्रतिनिधित्व मिळाल्याचे आजवरचे चित्र आहे.“
पुढे ते म्हणतात, “वंचितने जाहीर केलेले उमेदवार हे प्रस्थापित पक्षांना सोडून वंचितमध्ये आले आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास खतीब सैय्यद नातीकोद्दीन हे विदर्भातील कॉँग्रेसचे मोठे नेते होते. तसेच ते कॉँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार देखील होते. खतीब यांच्याप्रमाणेच इतरही काही उमेदवारांचा यात समावेश आहे. या सर्वांनी त्यांचे पक्ष सोडून वंचितचा पर्याय निवडण्याचे कारण म्हणजे त्यांना आता असे वाटते की, इतर पक्ष केवळ मुस्लिमांची मत मिळवण्याच्या प्रयत्न करतात. एकदा त्यांची मते मिळाली की ते मुस्लिमांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. वंचित मुस्लिमांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकते म्हणून या सर्वांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय त्यांना उमेदवारी देऊन मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने वंचितने टाकलेले पाऊल अनुकरणीय असून त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.”
विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाने ११ मुस्लिम उमेदवार देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. याविषयी उबेद बाहुसेन म्हणतात, “ आपल्याकडे बहुतेकवेळा राजकीय वंचित घटकांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न होतो. प्रस्थापित प्रतिनिधि वंचितांचे विशेषतः मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वंचितच्या पाठीमागे मोठा बहुजन वर्ग आहे. त्यामुळे वंचितने मुस्लिमांना उमेदवारी देऊन त्यांची राजकीय बाजू भक्कम करण्याचे काम केले आहे असे मला वाटते.”
राजकीय घडामोडींचे अभ्यासक प्रदीप देशमुख याविषयी बोलताना म्हणतात, “ मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची वंचितची पूर्वीपासून भूमिका राहिली आहे. प्रकाश आंबेडकर हे वंचित घटकांना सत्ता देण्याचा किंवा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. मुस्लिम समाज हा नेहमी कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मत देताना दिसतो. वंचितच्या या भूमिकेतून प्रकाश आंबेडकर मुस्लिम मतदान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे हे दिसते.”
...यासाठी मुस्लिम प्रतिनिधित्व वाढणे गरजेचे
वंचित बहुजन आघडीची पहिली यादी जाहीर झाली. या यादीमध्ये नांदेड दक्षिण मधून वंचितने फारूख अहमद यांना उमेदवारी दिली आहे. फारूख अहमद हे वंचितचे राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. याविषयी बोलताना ते म्हणतात, “ संविधान सभेत ज्यावेळी सामाजिक आरक्षणाचा विषय आला त्यावेळी मागासवर्गीयांमध्ये जे घटक आहेत त्यांना निवडून घेण्यात आले. त्यावेळी मुस्लिमांचा स्वतंत्र विचार करण्यात आला नाही.”
पुढे ते म्हणाले, “ या घटनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मांडला होता. हा मुद्दा मांडण्याचा उद्देश संसदेत वंचितांचे किमान प्रतिनिधित्व निर्माण करण्याचा होता. परंतु त्यावेळच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. अगदी तेव्हापासून मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या निम्मेपण प्रतिनिधित्व मुस्लिम समाजाला मिळाले नाही. मुस्लिमांचे प्रतिनिधित्व वाढवणे गरजेचे असल्यामुळे वंचितने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली आहे.”
वंचितच्या या कृतीतून इतर राजकीय पक्षांनी काय बोध घ्यावा असे विचारले असता ते म्हणतात, " वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीही मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली आहे. फक्त उमेदवारी न देता त्यांच्या मागे मतदारांची ताकद उभी केली आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पक्षाच्या हक्काचे मतदान मुस्लिम उमेदवारांना मिळवून देतात. परंतु इतर राजकीय पक्ष असे करताना दिसत नाहीत. मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही तरी ते आपल्याला मतदान करतात अशा अविर्भावात इतर राजकीय पक्ष वावरताना दिसतात. त्यामुळेच त्या पक्षाचे नेतेही मुस्लिमांच्या प्रश्नांवर आवाज उठवताना दिसत नाहीत.”
नांदेड दक्षिण मधून फारुख अहमद या मुद्यांवर निवडणूक लढवणार
कोणत्याही निवडणुकीच्या वेळी राजकीय मंडळी मतदारांना विविध आश्वासने देत असतात. विविध मुद्यावर तर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ते करतात. याविषयी फारूख अहमद म्हणतात, “ सर्वात प्रथम मी राजकीय अस्पृश्यता हा मुद्या मतदारसंघात घेऊन जाणार आहे. कारण २८८ पैकी जवळपास १६९ लोक प्रतिनिधि हे एकाच घराण्यातील आहेत. तरीही आपल्या समाजात असणाऱ्या ४० % गरिबांना टोकाची पाऊल उचलावी लागतात. इतके लोकप्रतिनिधि असूनही आपल्या समाजाला न्याय मिळत नाही.”
पुढे ते म्हणतात, “ माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. शिक्षित तरुणाई आज घरी बसून आहे. याशिवाय दर्जेदार शिक्षणाचा, आरोग्य सुविधांचा मोठा प्रश्न आहे. विकासनिधी सामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. अशा विविध मुद्यांवर मी येणारी निवडणूक लढणार आहे.”
मुस्लिम समाज आणि राजकारण
देशाच्या संसदेत आणि महाराष्ट्राच्या विधीमंडळात लोकसंख्येच्या तुलनेत आजवर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मुस्लिम लोकप्रतिनिधि झाले आहेत. स्थानिक पातळीवरील निवडणूका असो, विधानसभेच्या निवडणूका असो किंवा लोकसभेच्या निवडणूका असो बहुतेकवेळा मुस्लिमांना उमेदवारी नाकारली जाते. मात्र राजकारण करण्यासाठी आणि मतदानासाठी आजही मुस्लिम समाजाची गरज सर्व राजकीय पक्षांना भासते.
राज्यात २५ पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहेत. तरीही आजच्या घडीला AIMIM आणि वंचित सोडून लोकसंख्येच्या तुलनेत इतर राजकीय पक्ष मुस्लिम उमेदवार देत नाहीत. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आपल्याला ते पहायला मिळाले. पक्षांनी मुस्लिम उमेदवार न दिल्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्रात आज विधानपरिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघडीने ११ मुस्लिमांना दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेकडे राजकीय विचारवंत सकरात्मकतेने बघत आहेत. जर आपल्याला लोकशाही भक्कम करायची असेल तर त्या त्या समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचितने जाहीर केलेली दुसरी उमेदवार यादी
-
मलकापूर - शहजाद खान सलीम खान
-
बाळापूर - खातिब सय्यद नतीकउद्दीन
-
परभणी - सय्यद सलीम सय्यद साहेबजान
-
संभाजीनगर मध्य मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक
-
गंगापूर - सय्यद गुलाम नबी सय्यद
-
कल्याण पश्चिम - अयाझ गुलजार मोहवी
-
हडपसर - मोहम्मद अफरोज मुल्ला
-
माढा - इमतियाज जफर नदाफ
-
शिरुर - अरीफ मोहम्मअली पटेल
-
सांगली - अल्लाउद्दीन ह्यातचंद काझी