युनूस परवेझ अन्सारी आणि सौरभ चक्रवर्ती यांच्या लग्नाच्या कार्डचे मुखपृष्ठ.
राजस्थानच्या कोटा हे कोचिंग व्यवसायासाठी प्रसिद्ध शहर आहे. याच शहरातील मस्जिद गल्ली येथे राहणाऱ्या अब्दुल रऊफ अन्सारी आणि विश्वजित चक्रवर्ती यांची मैत्री गेल्या चार दशकांपासूनची आहे. या दोन मित्रांनी जात धर्मा पलीकडे जात त्यांची मैत्री जपली आहे. स्वतःच्या कौटुंबिक जबाबादाऱ्या पार पडत या मित्रांनी एकमेकांना व्यवसाय करण्यात साथ दिली आहे. अलीकडे सामाजिक आणि धार्मिक कारणांमुळे समाजातील सौहार्द बिघडत चालला आहे. यातच या दोन मित्रांनी आपल्या कृतीने सौहार्दाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. येत्या चार दिवसात अब्दुल आणि विश्वजित यांच्या मुलांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या दोन जिवलग मित्रांनी हा आनंद एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अब्दुल यांचा मुलगा युनूस परवेझ अन्सारी आणि विश्वजित यांचा मुलगा सौरभ चक्रवर्ती यांचा विवाह एकाच मंडपात होणार आहेत. येत्या १९ एप्रिलला होणारा हा विवाहसोहळा हिंदू आणि मुस्लिम धर्मातील सौहार्द आणि मैत्रीचे अनोखे उदाहरण असणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही विवाहांसाठी एकच निमंत्रणपत्रिका छापण्यात आली आहे. ही निमंत्रण पत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या निमंत्रणपत्रिकेच्या मुखपृष्ठावर युनूस परवेझ अन्सारी आणि त्यांची होणारी पत्नी फरहीन अन्सारी तसेच सौरभ चक्रवर्ती (रिंकू) आणि त्यांची होणारी पत्नी सृष्टी राय यांची नावे आहेत. पत्रिकेच्या एका बाजूला निकाह समारंभाची माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूला हिंदू विवाहाचा ‘शुभ विवाह’ समारंभाचा तपशील आहे. दोन्ही धर्मांच्या प्रथा आणि चिन्हांचा या पत्रिकेत समान आदर राखण्यात आला आहे. हिंदी आणि उर्दू भाषांचा वापर करून ही पत्रिका सर्वसमावेशक पद्धतीने तयार करण्यात आली आहे.
विवाहानंतरच्या स्वागत समारंभाचे नावही खास आहे. या समारंभाचे नाव ‘दावत-ए-खुशी’ ठेवण्यात आले आहे. हा स्वागत समारंभ दोन्ही कुटुंबांनी एकत्रितपणे आयोजित केला आहे. यामुळे या उत्सवाला एक वेगळीच रंगत येणार आहे.
मैत्रीची नवी परिभाषा
जनकपुरी परिसरात अब्दुल आणि विश्वजितची घरे शेजारी-शेजारी आहेत. दोघेही मिळकत व्यवसायात भागीदार आहेत. आपल्या मुलांच्या विवाहाच्या निमित्ताने त्यांनी हा आनंद एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या विवाहात दोन्ही कुटुंबांनी पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारीही परस्पर बदलून घेतली आहे. विश्वजित आणि त्यांच्या पत्नी मधू चक्रवर्ती युनूसच्या निकाह समारंभात पाहुण्यांचे स्वागत करतील. तर अब्दुल रऊफ आणि त्यांच्या पत्नी अजीजन अन्सारी सौरभच्या विवाहात पाहुण्यांचे आदरातिथ्य करतील. ही छोटीशी गोष्ट समानता, जवळीक आणि सामाजिक सौहार्दाचा दृढ संदेश देते.
युनूस परवेझ अन्सारीआयटी कंपनीत काम करतो. तर सौरभ चक्रवर्तीचा औषध वितरणाचा व्यवसाय आहे. दोघेही या अनोख्या विवाहसोहळ्याबाबत उत्साही आहेत. सौरभ म्हणतो, “जेव्हा विवाहाचे नियोजन सुरू झाले, तेव्हा दोन्ही कुटुंबांनी हा सोहळा एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दोन्ही कुटुंबाचा आनंद दुप्पट झाला आहे. हा सोहळा केवळ दोन कुटुंबांना जोडणारा नाही, समाजातील दोन धर्मांमध्ये सौहार्द वाढवणारा असणार आहे.”
अब्दुल आणि विश्वजित यांचा विवाहसोहळा भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. आजच्या काळात सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या बातम्या सातत्याने समोर येतात, तेव्हा कोट्यातील हा आनंदोत्सव समाजाला एकता आणि सौहार्दाचा संदेश देतो. दोन धर्म, दोन संस्कृती आणि दोन कुटुंबे एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन आनंद साजरा करत आहेत हे खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिबिंब आहे.
हा विवाहसोहळा केवळ दोन व्यक्तींचा मिलन सोहळा नसून, सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे. निमंत्रणपत्रिकेपासून ते स्वागत समारंभापर्यंत प्रत्येक बाबतीत दोन्ही कुटुंबांनी समानतेचा आदर्श घालून दिला आहे. मात्र,अशा सकारात्मक घटनांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरावर सौहार्द आणि संवाद वाढवण्याची गरज आहे.