केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा जम्मू-काश्मीरचा विशेष दौरा सुरु

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 19 h ago
केंद्रीय गृहमंत्र्यांचे स्वागत करताना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा
केंद्रीय गृहमंत्र्यांचे स्वागत करताना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जम्मू-काश्मीरचा दोन दिवसीय दौरा कालपासून सुरू झाला आहे.  जम्मू विमानतळावर त्यांचं स्वागत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केलं.

नायब राज्यपाल सिन्हा यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिलं, "जम्मूत पोहोचलेल्या मा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा जी यांचं स्वागत केलं."

या दौऱ्यादरम्यान अमित शहा जम्मू-काश्मीरमध्ये एका उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. या बैठकीत केंद्रशासित प्रदेशातील सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तपासली जाईल. जम्मू-काश्मीर पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आणि गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दहशतवादविरोधी कारवाया, सीमेपलीकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न आणि जम्मू-काश्मीरमधील एकूणच सुरक्षा परिस्थिती यावर चर्चा होईल, असं अपेक्षित आहे.

या आढावा बैठकीव्यतिरिक्त, गृहमंत्री आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागांना भेट देणार आहेत. तिथे ते सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करतील आणि तैनात जवानांचं मनोबल वाढवतील. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि सीमा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी सरकारकडून सध्या जोरदार प्रयत्न सुरू असताना हा दौरा होत आहे.

हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. कारण अलीकडेच कठुआ जिल्ह्यातील दहशतवादी कारवायांमुळे जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि स्थिरता बिघडली आहे. अमित शहा यांनी यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये जम्मू-काश्मीरला भेट दिली होती. त्या दौऱ्यात त्यांनी अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली होती आणि या भागात शांतता व स्थिरता आणण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित केली होती. त्या वेळी त्यांनी राजकीय नेते, सुरक्षा अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चाही केली होती.

ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यापासून सरकारने दहशतवादविरोधी मोहिमांना गती दिली आहे आणि या भागात पायाभूत सुविधा तसेच विकासाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. शहा यांचा हा आगामी दौरा या प्रयत्नांचा एक भाग मानला जातोय. यात सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणं यावर भर दिला जाईल.

नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यानही शहा यांनी जम्मूला भेट दिली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती. या भेटीत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि जाहीर सभांमधून जनतेला भाजपची विकास आणि सुरक्षेसाठीची वचनबद्धता पटवून दिली. त्यांनी विरोधी पक्ष, विशेषतः नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि काँग्रेसवर टीका केली होती. राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याच्या मुद्द्यावर या पक्षांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या दौऱ्याकडून जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडेल, अशी अपेक्षा आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter