रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात युनानी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी सावर येथे हे महाविद्यालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती, पण त्या जागेवर आता क्रीडा संकुलाची इमारत बांधली गेल्याने ती महाविद्यालयासाठी पुरेशी नाही. त्यामुळे आता सरवर येथे हे महाविद्यालय उभारण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे स्थानिकांना वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी मिळेल आणि युनानी पद्धतीच्या उपचारांना चालना मिळेल.
मंत्रालयात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत या प्रकल्पातील अडचणींवर चर्चा झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक अजय चंदनवाले आणि आयुष संचालनालयाचे संचालक रमण घोंगळारकर उपस्थित होते. बैठकीत सरवर येथील जागेला अंतिम मान्यता देण्यावर शिक्कामोर्तब झालं. ही जागा महसूल विभागाने सुचवली असून, आदिती तटकरे यांनीही याला सहमती दर्शवली आहे.
हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की, “महाविद्यालय लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शासकीय रिकाम्या इमारतीत किंवा भाड्याच्या जागेत शिक्षण सुरू करावं. याशिवाय, महाविद्यालयासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर प्रक्रिया त्वरित पूर्ण कराव्यात.” या सूचनांमुळे प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. सरवर येथील जागा महाविद्यालयासाठी योग्य असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युनानी वैद्यकीय शिक्षणाचं महत्त्व
युनानी वैद्यकशास्त्र ही प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे. ही पद्धत आयुर्वेद आणि सिद्ध यांच्यासारखीच भारतात रुजलेली आहे. युनानी पद्धतीत औषधी वनस्पती, आहार आणि जीवनशैली यांचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जातात. रायगडसारख्या ग्रामीण भागात युनानी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास स्थानिकांना परवडणाऱ्या उपचारांचा लाभ मिळेल. तसंच, या पद्धतीच्या शिक्षणाला चालना मिळून नव्या पिढीला करिअरच्या संधी उपलब्ध होतील.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter