दोन मुस्लीम तरुणींनी घडवले महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 10 h ago
९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभागी झालेले मान्यवर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर
९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभागी झालेले मान्यवर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर

 

तब्बल ७१ वर्षांनी राजधानी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. काल दि. २१ फेब्रुवारीला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे (SP)चे नेते शरद पवार आणि ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या उपस्थित साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण ठरल्या त्या शमीमा अख्तर आणि रुकय्या मकबूल. 

सरहद संस्थेच्या माध्यमातून दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुरुवातीलाच दिपप्रज्वलन झाल्यानंतर काश्मीरच्या रुकय्या मकबूलने ‘नमोकार मंत्र’ म्हटला. हा मंत्र जैन धर्माचा मुल मंत्र आहे. या मंत्रात अरिहन्तों, सिद्धों, आचार्यों, उपाध्यायों आणि साधू या पाच शक्तींचे नामस्मरण केले जाते. हा मंत्र महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन जैन गुहेमध्ये कोरला गेला आहे. 

नमोकार मंत्र म्हणणारी रुकय्या मकबूल 
‘नमोकार मंत्र’ म्हणणारी रुकय्या मकबूल ही भारताचे नंदनवन असणाऱ्या काश्मीरमधून येते. पुण्यातील सरहद संस्थेची ती सदस्य आहे. तसेच ती शिक्षिका देखील आहे. ती काश्मीरच्या लहान मुलांना शिकवण्याचे काम करते. नमोकार मंत्र म्हणणारी रुकय्या म्हणते, “मी सर्व जात, धर्म, पंथाचा आदर करते. नमोकार मंत्र मी काश्मीर आणि जगात सुख, शांतता नांदवी म्हणून गाते. हा मंत्र जगातील सर्व अरिहन्तों, सिद्धों, आचार्यों, उपाध्यायों आणि सूफी संतांना एकरूप करतो.” 
 

रुकय्याने हा मंत्र म्हणत साहित्य संमेलनाची मंत्रमुग्ध करणारी सुरुवात केली. हा मंत्र म्हटल्यानंतर तिच्यावर उपस्थित मान्यवर आणि साहित्य प्रेमींनी कौतुकाचा वर्षाव केला. 

तर दुसरीकडे शमीमाने देखील तिच्या गायकीने सर्वांना भारावून टाकले. शमीमाने तिच्या सुरेल आवाजात महाराष्ट्र गीत अर्थात ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ गायले.यावेळी तिला सर्वांनी टाळ्यांची दाद दिली. तर उद्घाटन कार्यक्रमाच्या सांगतेवेळी तिने अतिशय चांगल्या उच्चारात ज्ञानेश्वरांनी लिहलेली वैश्विक प्रार्थना ‘पसायदान’ गायले. मुस्लिम बांधव दुआ करतात त्या पद्धतीने तिने हात वर करता पसायदान गायले. या पसायदानाचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 
 
 
शमीमा अख्तर विषयी 
 
शमीमा अख्तर ही मूळची काश्मीरची. काश्मीरच्या बांदिपुरा भागात ती लहानाची मोठी झाली. एका दहशतवादी हल्ल्यात तिच्या आईला गोळी लागली. याच दहशतीत ती लहानाची मोठी झाली. आता हीच शमीमा धर्म, जात, पंत या पलीकडे जात आपल्या आवाजाने शांततेचा आणि एकतेचा संदेश देते.

 
शमीमाला घरातूनच संगीताचा वारसा लाभला आहे. तिचे आजोबा प्रसिद्ध कव्वाली गायक होते. त्यामुळे संगीताचे सूर सतत तिच्या कानावर यायचे. गाण्याचा छंद असलेल्या शमीमाच्या गायनाचा सूर आई आणि शिक्षकांच्या पाठिंब्याने आणखी बहरत गेला. तिने लखनौ विद्यापीठातून संगीतात पदवीही घेतली. तिने मराठी गाणी म्हणण्यास सुरुवात केली. वारीच्या काळात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात असताना शमीमानं गायलेली मराठी गाणी कानावर पडली. तिने गायलेली विठ्ठलाची गाणी, अभंग याचे सूर लोकांना आवडले. आता शमीमाचा आवाज हा फक्त काश्मीरपुरता मर्यादित न राहता जगभर पोहचला आहे. तिने गायलेले सर्वात प्रसिद्ध गीत हे ‘माझे माहेर पंढरी’ आहे. या गाण्यातून ती महाराष्ट्रासह देशाच्या घराघरात पोहचली आहे. 

रुकय्या आणि शमीमा यांनी गायलेल्या गीतांमुळे महाराष्ट्राने राजधानी दिल्लीत धर्मिक सौहार्दाचा संदेश दिला आहे. या दोन्ही मुस्लिम मुलींनी जात धर्माच्या पलीकडे जाण्याच्या प्रार्थना म्हणत सर्वांना एकरूप केले. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या उक्तीला धरून धार्मिक सद्भावाचे आणि एकतेचे वैचारिक अधिष्ठान या साहित्य संमेलनामुळे प्राप्त झाले आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन आपली सांस्कृतीक परंपरा, वारसा सर्वांनी जपला पाहिजे हा संदेश या कृतीतून गेला.  

मराठी ही भक्ती, शक्ती आणि युक्तीची भाषा - मोदी 
या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र यांनी केले. यावेळी मोदींनी मराठी साहित्य आणि महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा आणि वैभवशाली इतिहासाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “दिल्लीच्या भूमीवर मराठी भाषेला समर्पित हा प्रतिष्ठित कार्यक्रम आयोजित केला जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ एका भाषेपुरते किंवा राज्यापुरते मर्यादित नाही. मराठी साहित्यावरील हे संमेलन स्वातंत्र्यलढ्याचे सार तसेच महाराष्ट्र आणि राष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवते. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या मराठी भाषेचा राजधानी दिल्लीत मनापासून सन्मान केला जात आहे. मी मराठीबद्दल विचार करतो तेव्हा मला संत ज्ञानेश्वरांचे शब्द आठवणे स्वाभाविक आहे: 'माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृततेहि पैजासी जिंके।' याचा अर्थ मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड आहे. म्हणूनच मराठी भाषा आणि संस्कृतीवरील माझे प्रेम आहे.”  

पुढे ते म्हणाले, “हे मराठी संमेलन एका ऐतिहासिक क्षणी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत, पूज्य अहिल्याबाई होळकरजींच्या जयंतीला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत आणि काही काळापूर्वीच आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून घडवलेल्या आपल्या संविधानाची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषिक लोक भाषेला 'अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा यासाठी वाट बघत होते. तो दर्जा देखील मिळाला आहे. आता मराठी ‘अभिजात भाषा’ झाली आहे.”  

मराठी भाषेविषयी बोलताना मोदी म्हणाले, “भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही तर भाषा ही आपल्या संस्कृतीची वाहक आहे. समाजाला घडवण्यातही भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. मराठी भाषेने महाराष्ट्र आणि देशभरातील असंख्य व्यक्तींच्या विचारांना आवाज दिला आहे. आपली सांस्कृतिक ओळख घडवली आहे. मराठी ही 'भक्ती'  'शक्ती'  आणि 'युक्ती' ची भाषा आहे.” 

राजकारण आणि साहित्य हे परस्परांना पूरक - शरद पवार  
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून उपथित होते. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले. ते म्हणाले, “सध्या समाजाची एकात्मतेची वीण उसवत चालल्याचे दिसत असताना साहित्यिकांवर जबाबदारी वाढली आहे. साहित्यिकांनी महानुभाव पंथ, वारकरी परंपरा असो, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, न्या. रानडे, र. धों. कर्वे, आगरकर या सुधारकांच्या वाटेने समाजाला नेण्याचा प्रयत्न करावा.” 

पुढ ते म्हणाले, “साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा काय संबंध ही चर्चा संमेलनावेळी होत असते. मात्र यावेळी तशी चर्चा झाल्याचे दिसत नाही. राजकारण आणि साहित्य परस्परपूरक असल्याचे सांगताना हा वाद थांबावा. गुरुस्थानी असलेले यशवंतराव चव्हाण उत्तम लेखक होते. तर मीही ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून व्यक्त झालो. सार्वजनिक जीवनातील ३० वर्षांहून अधिक काळ दिल्लीच्या दरबारी मराठी अस्मिता राखण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडच्या काळात टीका करणारा, विरोधी लिहिणारा तो विरोधक मानण्याची प्रथा रुढ होत आहे. ही असहिष्णुता फारशी योग्य नाही.” 

भाषा ही जोडणारी असावी, तोडणारी नाही - डॉ. तारा भवाळकर
भाषा ही जोडणारी असावी, तोडणारी नाही. दिल्लीतील या साहित्य संमेलनाची अध्यक्ष एक स्त्री झाली, हा मुद्दाच नाही, तर गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे,’ असे मत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केले. मराठी भाषेच्या निर्माणवर त्या म्हणाल्या, “भाषा ही जैविक असते, प्रवाही असते. बोलली गेली, तर ती जिवंत राहते व महाराष्ट्रात संतांनी ही मराठी जिवंतच ठेवली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठीही त्यांनी भूमी निर्माण केली. ज्या दिवशी आईने बाळासाठी पहिली ओवी म्हटली, त्या दिवशी मराठी निर्माण झाली.”  

पुढे त्या म्हणाल्या, “लोकसंस्कृती म्हणजे ग्रामीण संस्कृती नाही. लोकसंस्कृती म्हणजे काय, तथाकथित अशिक्षित महिलांमध्ये असलेला व्यावहारिक शहाणपणा. बोली भाषा टिकली तर मराठीचे अभिजातत्व टिकेल. साहित्य संमेलनाची परंपरा सुरू झाली, तेव्हा ही संमेलने विशिष्ट वर्गाची होती. मात्र, आज या संमेलनाची व्याप्ती वाढत आहे. जो मराठी समाज उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्टया सक्षम आहे आणि ज्याची आकांक्षा सर्व स्तरावर जागतिकतेशी स्पर्धा करायची आहे. त्याची संख्या आजच्या यंत्रयुगात वेगाने वाढत आहे. या अस्वस्थ करणाऱ्या भोवतालात मला मराठीच्या भवितव्याबद्दल चिंता वाटते”

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याची चौफेर चर्चा होत आहे. मात्र त्यापुढील आव्हानांचा वेध घेणे गरजेचे आवश्यक आहे. 

जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा?

देहाचा विटाळ. देहीच जन्मला
शुद्ध तो जाहला कवणप्राणी
उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान
कोण देह निर्माण नाही जगी

असे आमच्या संत कवयित्रींनी सांगितले आहे. मग मला असा एक माणूस दाखवून द्या जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आलेला नाही. तरीही आज कुणी म्हणत असेल माझा जन्म जैविक नाही, तर त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा? असे परखड मत ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मांडले.

-फजल पठाण 
([email protected])

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

 

Awaz Marathi Twitter