उद्या ठरणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार ? याचे गूढ येत्या बुधवारी (ता. ४) उलगडणार असून त्याच दिवशी भाजपच्या नव्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड होईल, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्याने आज दिली. भाजपच्या या बैठकीला केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा रंगली असून, आज सायंकाळी भाजप नेते गिरीश महाजन हे ठाण्यातील शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी महत्त्वाची पदे आपल्यालाच हवी असा आग्रह शिंदेंकडे धरल्याचे कळते. 

मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्याच गळात पडणार हे जवळपास निश्चित झाले असून त्याबाबतच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ही विधानभवनामध्ये होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे आज राजकीय  वर्तुळामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा देखील चांगलीच रंगली होती. आज सायंकाळी भाजपचे संकटमोचक मानले जाणारे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची ठाण्यातील घरी जाऊन भेट घेतली आहे. शिंदे हे दरे या गावातून रविवारीच ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. 

या भेटीवर भाजप नेते गिरीश महाजन म्हणतात, “महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सव्वा तास शिंदे यांच्याशी चर्चा झाली. सध्या शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते घरी आहेत, त्यांना सलाईनही लावण्यात आले आहे. उद्या (ता.३) आम्ही सर्व जण आझाद मैदानावर पाहणी करण्यासाठी जाणार आहोत.”  

आज त्यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलाविली होती पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. शिंदेंच्या अन्य बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आज शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती. मात्र शिंदे गावी गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकटेच दिल्लीमध्ये गृहमंत्री शहांच्या भेटीला गेल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. 

त्या बातम्या निराधार  : श्रीकांत शिंदे
उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची निवड होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याबाबत आज श्रीकांत यांनी स्वतःहून खुलासा करत या बातम्या निराधार असल्याचे नमूद केले. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरून पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली आहे. "मी उपमुख्यमंत्री होणार, अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस प्रसिद्ध केल्या जात आहेत. वस्तुतः यात कोणतेही तथ्य नसून, या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र, पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता." 

अजित पवार दिल्लीत शहांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी आज रात्री दिल्लीमध्ये दाखल झाले. शहा यांच्याशी मंत्रिमंडळच्या रचनेबाबत चर्चा केली जाऊ शकते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमध्ये पवार यांची ही भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी झालेली पहिलीच भेट आहे. येत्या ५ तारखेला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या दिल्लीवारीला महत्त्व आले आहे. 

अजित पवार यांनी दिल्लीत आल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. यावेळी संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसने १० ते १२ मंत्रिपदांची मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात ७ ते ८ मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. नावे निश्चित असलेल्या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ, आदिती तटकरे, दत्ता भरणे, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील आदी नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे देखील शहांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये येणार असल्याची चर्चा आहे पण त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. एकीकडे शिवसेनेचे नेते गृह खाते मिळविण्यासाठी दबाव टाकत असताना शिवसेनेचे काही खासदार उपमुख्यमंत्रिपदासाठीही आग्रही असल्याचे दिसते. शिंदे मंत्रिमंडळात नसतील तर भाजप व अजित पवार यांच्या प्रभावाखाली शिवसेनेला सावत्र वागणूक मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळात राहणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद शिवसेनेच्या खासदारांकडून करण्यात आला आहे. शिंदे यांनीच आज दूरध्वनीवरून शिवसेनेच्या खासदारांशी संवाद साधला.

सीतारामन, रूपानी पर्यवेक्षक 
भाजप विधिमंडळ नेता निवडीसाठी पर्यवेक्षक म्हणून पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची नियुक्ती केली आहे. येत्या पाच तारखेला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याने त्याआधी विधिमंडळ गट नेत्याची निवड क्रमप्राप्त आहे. येत्या पाच तारखेला आझाद मैदानावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नेमके किती मंत्री शपथ घेतील? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार? हे देखील कळलेले नाही. याखेपेस मंत्रिपदाच्या वाटपाचा निर्णय स्वतः शहा हे घेणार असून केवळ चेहरे पाहून पदे दिली जाणार नाहीत असे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter