राज्यात आज ‘मतोत्सव’!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 23 h ago
महाराष्ट्रात मतोत्सव
महाराष्ट्रात मतोत्सव

 

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या (ता.२०) मतदानाची प्रक्रिया पार पडेल. प्रत्येक मतदाराला निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राज्यभर प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

एकट्या मुंबईत ३० हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून राज्यातील ९९० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. विविध भागांत राज्य पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जाणार असल्याची माहिती पोलिस मुख्यालयाकडून देण्यात आली आहे.

आचारसंहितेच्या काळात ६५५.५३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात १५३ कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. त्यासोबत ६८.६३ कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा, ७२ कोटींचे अमली पदार्थ, २८२.४९ कोटींचे मौल्यवान धातू, ३.७८ कोटी रुपये मूल्य असलेल्या भेट वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रवृत्ती असलेल्या सुमारे ८० हजार व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे मुख्यालयाकडून सांगण्यात आले. राज्यात एकूण ७८ हजार २६७ शस्त्र परवाने जारी करण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात यापैकी ५६ हजार ६०४ परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली. तब्बल २ हजार २०६ अवैध शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान आयोगाचे ‘सी-व्हिजिल ॲप’ आणि ‘एनजीएसपी’ पोर्टलवर आचारसंहिताभंगाच्या एकूण २२ हजार १९३ तक्रारी प्राप्त झाल्या असून १७ हजार ४८५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

निवडणुकीनिमित्त राज्यात ८५ हजार ९५९ पोलिस तैनात केले असून गृहरक्षक दलाचेही ७० हजार ४५० जवान तैनात करण्यात आले आहेत.

जय्यत तयारी
२८८ - मतदारसंघ
९.७ कोटी - एकूण मतदार
५ कोटी २२ हजार ७३९ - पुरुष
४ कोटी ६९ लाख ९६ हजार - महिला
४ हजार १३६ - रिंगणातील उमेदवार
३ हजार ७७१ - पुरुष
३६३ - महिला
२ - अन्य
२ लाख २० हजार ५२० - शाईच्या बाटल्या
१ लाख ४२७ - एकूण मतदान केंद्रे
४२६ - महिला नियंत्रित केंद्रे
९९० - संवेदनशील केंद्रे

महायुती प्रचारातील मुद्दे
माझी लाडकी बहीण योजना
बटेंगे तो कटेंगे (योगींची घोषणा)
एक है तो सेफ है ( मोदींची घोषणा)
व्होट जिहाद, धर्मयुद्ध

मविआ’ प्रचारातील मुद्दे
जातनिहाय जनगणना
सामाजिक न्याय
संविधान बचाओ
अदानींचे प्रकल्प

मतदानाची वेळ : सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत
मतमोजणी - २३ नोव्हेंबर