तिरुपती प्रसाद : राजकीय नाटके नको - सर्वोच्च न्यायालय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

तिरुपतीच्या प्रसादातील कथित चरबीजन्य पदार्थांच्या भेसळीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. 'या प्रकरणामध्ये न्यायालयाला आम्ही राजकीय संघर्षभूमी होऊ देणार नाही, आम्हाला कोणतेही राजकीय नाटक नको आहे,' असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नोंदविले. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या आदेशांमुळे आंध्र प्रदेश सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) आपोआप मोडीत निघणार आहे.

आंध्र प्रदेश सरकारने राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली होती. न्या. भूषण गवई आणि न्या. के.व्ही. विश्वनाथन यांच्यापीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली. याप्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या अनेक याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

शंका नाही पण...: सॉलिसिटर जनरल
"राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या क्षमतेबाबत आपल्या मनात कोणतीही शंका नाही; मात्र केंद्रीय पोलिस दलातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी," असा मुद्दा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडला.