तिरुपती मंदिरात बिगर हिंदू धर्मीय कर्मचाऱ्यांना काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात काम करणाऱ्या बिगर हिंदू कर्मचाऱ्यांबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारला पत्र लिहिण्याचेही ठरविण्यात आले आहे.
राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेनंतर ‘टीटीडी’च्या ट्रस्टचीही नव्याने स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर अध्यक्ष बी.आर.नायडू यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ट्रस्टची पहिलीच बैठक झाली. तिरुपती मंदिरात काम करण्यास बिगर हिंदू धर्मीय कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. ‘मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांची मोजणी करणार आहे.
मी स्वतः त्यांना भेटून ऐच्छिक निवृत्ती घेण्याची विनंती करणार आहे. त्यांना ते मान्य नसेल तर महसूलसारखे सरकारी विभाग किंवा नगरपालिका किंवा कोणत्याही महानगरपालिकेत त्यांची बदली करण्यात येईल. अशा कर्मचाऱ्यांबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे सरकारला कळविण्यात येणार आहे,’ असे नायडू यांनी सांगितले.
तूप खरेदीसाठी पुन्हा निविदा
तिरुपती येथे देण्यात येणाऱ्या प्रसादातील लाडवांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या दर्जावरुन काही महिन्यांपूर्वी मोठे वादंग झाले होते. त्यामुळे उच्च प्रतीच्या तुपाच्या खरेदीसाठी पुन्हा निविदा मागविण्याची शक्यता या बैठकीनंतर व्यक्त करण्यात आली.
ट्रस्टचे अन्य निर्णय
बालाजीच्या दर्शनासाठीचा कालावधी दोन-तीन तासांपेक्षा कमी करणार
भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा अन्य तंत्रज्ञानाचा वापर
दर्शन कालावधीबाबत उपाय शोधण्यासाठी विशेषज्ज्ञांची समिती स्थापणार
तिकिटांमधील अनियमिततेबाबतच्या तक्रारींच्या चौकशीनंतर विविध राज्यांमधील एपी पर्यटन महामंडळाचा दर्शन कोटा रद्द करणार
दर्शनाला येणाऱ्या नेत्यांच्या राजकीय भाषणावर निर्बंध. तसे केल्यास त्यांच्यासह प्रचार करण्याऱ्यांवर कायदेशीर कारवाई