बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील सद्गुरू शरण इमारतीतील घरात घुसून, एका अज्ञात तरुणानं त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री २च्या सुमारास घडली. हल्लेखोरानं सैफवर सहा वार केले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या १० हून अधिक टीम तपास करत होत्या.
सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तूर्त त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. नितीन डांगे आणि त्यांच्या टीमने जी तातडीची सेवा दिली आणि काळजी घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सैफची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. आम्हाला विश्वास आहे की तो लवकरच पूर्णपणे बरा होईल, या कठीण काळात चाहत्यांनी आणि शुभचिंतकांनी दाखविलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे सैफच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
हल्ल्याची घटना
अज्ञात व्यक्ती मुख्य दरवाजाच्याशेजारी असलेल्या पहिल्या रुममधून घरात शिरला. या अज्ञात व्यक्तीला सर्वातप्रथम घरात काम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. अज्ञात व्यक्तीने मोलकरणीच्या हातावर चाकूने वार केला. यामुळे मोलकरणीने आरडाओरडा सुरु केला. मोलकरणीच्या मदतीसाठी सैफ अली खान बाहेर धावून आला. यानंतर सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाली. या झटापटीत अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या हातावर, पाठीवर, मानेवर प्राणघातक वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पाठीवर झालेल्या वारामुळे चाकूचा तुकडा त्यांच्या शरीरात अडकला होता, ज्याला शस्त्रक्रिया करून काढण्यात आले.
पोलीस तपास
मुंबई पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आहे. क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांच्या एकूण २० पथकांनी तपास सुरू केला आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने 1 कोटी रुपये मागितले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. या 1 कोटीच्या मागणीवरून आरोपी आणि सैफच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणमध्ये वाद झाला होता. सैफने यामध्ये हस्तक्षेप करताच आरोपीने त्याच्यावर वार केल्याचं समोर आलं आहे.
सैफचा मुलगा जहांगीरची देखभाल करणाऱ्या नर्स एलियामाच्या जबाबात आरोपीने 1 कोटी मागितल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हल्ल्यात सैफ अली खान आणि दोन मोलकरीण जखमी झाल्याचादेखील उल्लेख आहे. दरम्यान, सैफ अली खान यांच्या घरातील काम करणारी मोलकरीण लिमा हिची देखील पोलिसांकडून चौकशी झाली आहे आणि या चौकशीनंतर ती पुन्हा सैफ अली खान यांच्या घरी परतली आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला होता ,त्यामुळे तो नालासोपारा-वसईच्या दिशेने पळाला असावा असा संशय होता. मुंबई पोलिसांना या प्रकरणात यश आलं असून,एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.सैफवर हल्ला केलेला आणि सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी हाच आहे का? अद्याप हे स्पष्ट झालं नाहीये. या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस आता कसून चौकशी करत आहेत.
कौटुंबिक प्रतिक्रिया
सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर चिंता व्यक्त केली आहे. पत्नी करीना कपूर खान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्ही या घटनेने हादरलो आहोत. सैफची प्रकृती आता स्थिर आहे, पण आम्ही सर्वजण धास्तावलेले आहोत." मुलं सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांनी त्वरित रुग्णालयात धाव घेतली आणि आपल्या वडिलांची विचारपूस केली.
त्याच बरोबर करीना कपूरने माध्यमांना विनंती करत एक पोस्ट शेअर केली आहे.ती म्हणते, “हा आम्हा कुटुंबीयांसाठी प्रचंड आव्हानात्मक दिवस होता. गेल्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलंय…या सगळ्याचा विचार आम्ही अजूनही करत आहोत. आमचं कुटुंब या कठीण काळातून जात असताना, मी मीडिया आणि पापाराझींना आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की, त्यांनी सतत अनुमान काढणं आणि या घटनेचं कव्हरेज करणं टाळावं. या काळात तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी निश्चितच आभारी आहे. मात्र, सतत एखाद्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं हा सुरक्षेसाठी मोठा धोका होऊ शकतो. मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. एक कुटुंब म्हणून या घटनेतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काही वेळ द्या. या संवेदनशील काळात तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते.”
करीना कपूरने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवला आहे. कमेंट सेक्शनमध्ये, “या कठीण काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत,” अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. याशिवाय, पूजा भट्ट आणि रवीना टंडन यांसारख्या अभिनेत्रींनीही सैफच्या सुरक्षेसाठी चिंता व्यक्त करत कलाकारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.
राजकीय प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, "सैफ यांच्याबाबत घडलेल्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पोलिस प्रशासन याची चौकशी करत आहे. जे झाले ते अस्वस्थ करणारे आहे मात्र मेगासिटी मुंबई हे जगातील सर्वांत सुरक्षित महानगर आहे. हे देखील तितकेच खरे."
ज्येष्ठ नेते, शरद पवार म्हणाले, "सैफ यांच्यावर झालेला हल्ला हा मुंबईतील ढासळत चाललेल्या कायदा- सुव्यवस्थेचे निदर्शक आहे. मध्यंतरी याच भागात एकाची हत्या झाली आणि हा आता दूसरा प्रयत्न आहे. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत."
सैफ अली खानच्या भेटीसाठी मंत्री आशिष शेलार गुरुवारी रात्री लीलावती रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात जाऊन त्यांनी सैफच्या कुटुंबियांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. शेलार म्हणाले, "आयसीयूमध्ये अभिनेते सैफ अली खान यांना बघून आलो, ते आराम करत आहेत. त्यांच्यावर सहा वार त्यांच्यावर झाले होते. दोन जखमा खोलवर झाल्या होत्या. जवळजवळ पाच तास त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करुया की ते लवकरात लवकर बरे व्हावेत. मी सकाळपासून पोलिसांच्या संपर्कात आहे, जो आरोपी आहे त्याला पकडण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. पोलिसांची १० पथकं आरोपीच्या शोधात आहेत.सैफ अली खान यांना सध्या विश्रांतीची गरज आहे. मुंबई सगळ्यात सुरक्षित शहर आहे, वांद्रेवासियांनी घाबरुन जाऊ नये."
सुरक्षा उपायांची गरज
या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटी आणि नागरिकांनी त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "सैफवर झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकून खूप दुःख झाले. आपल्या सुरक्षा व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे."
सैफ अली खान यांच्यावर झालेला हा हल्ला मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. सैफ अली खान यांच्या लवकर बरे होण्यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहेत.
याआधीच्या घटना
लॉरेन्स बिश्नोई टोळीने अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी १४ एप्रिलला पहाटे गोळीबार केला. काळवीट शिकार प्रकरणाने भावना दुखावल्याचे सांगत विश्नोई टोळीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती.
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी विश्नोई टोळीने हत्या केली. अभिनेता सलमानसोबतची जवळीक या कारणावरून सिद्दीकी यांची लॉरन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईन हत्या घडवून आणल्याचे तपासातून निष्पन्न झाले.