भारतीयांच्या रोजगार क्षमतेत अशी झालीये वाढ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 11 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भारतीय पदवीधरांमधील रोजगारक्षमतेत सातत्याने वाढ होत असून, आता ५० टक्क्यांहून अधिक पदवीधर रोजगारक्षम आहेत. जागतिक रोजगारक्षमता चाचणीनुसार, भारतीय पदवीधरांमधील रोजगारक्षमता यावर्षी ५४.८१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. मागील चाचणीत ती ५१.२५ टक्के होती. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, स्किल इंडिया अभियान आणि डिजिटल इंडिया यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांसह, कृत्रिम बुद्धीमत्ता आदी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर सरकारने भर दिला आहे. त्यामुळे ही वाढ झाली असल्याचे 'व्हीबॉक्स ईटीएस इंडिया स्किल्स २०२५' या अहवालात म्हटले आहे.

दहा वर्षांपूर्वी रोजगारक्षम पदवीधरांचे प्रमाण ३३ टक्के होते, ते आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. एका दशकात झालेली १७ टक्के वाढ वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करू शकणारे भविष्यासाठी तयार कर्मचारी तयार करण्याची भारताची वचनबद्धता दर्शवते, असे या अहवालात म्हटले आहे. 

आता ३५ वर्षांखालील भारतीय कर्मचाऱ्यांपैकी ६५ टक्के तरुणवर्ग आखाती देश, विशेषतः पश्चिम आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील उद्योगांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तयार आहे. तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, अक्षय ऊर्जा आणि एआय या क्षेत्रांतील कुशल भारतीय जागतिक नवोन्मेष आणि आर्थिक विकासाला चालना देत आहेत, असे 'इंडिया स्किल्स'चे मुख्य संयोजक निर्मल सिंग यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्र आघाडीवर
तंत्रज्ञान, उत्पादन, आरोग्यसेवा आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कर्मचारीभरती वाढत असून, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली यांसारखी प्रमुख राज्ये आघाडीवर आहेत.  तर पुणे, बंगळूर आणि मुंबई ही शहरे रोजगारक्षम प्रतिभेचे केंद्र म्हणून उदयास आली आहेत. डिजिटल आणि हायब्रिड कामकाज पद्धतीमुळे भारतीय प्रतिभेला जागतिक स्तरावर योगदान देण्याची संधी मिळत आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter