'असा' सुटला महाविकास आघाडीतील तिकिट वाटपाचा तिढा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावावरून सुरू असलेल्या वादावर अखेरीस समान हिस्सेदारीचा मार्ग काढण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी ८५ जागांवर निवडणूक लढविण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले असून २५५ जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित ३३ जागांवर चर्चा सुरू असून त्यापैकी मित्रपक्षांना १८ जागा देण्याची घोषणाही पत्रकार परिषदेत करण्यात आली.

या सर्व जागा महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने लढून सत्तेवर येईल असा विश्वास शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मात्र प्रत्येकी ८५ प्रमाणे २५५ जागा होत असल्याचे गणित ‘मविआ’ने मांडले असून अन्य जागांचा घोळ कायम असल्याचे दिसून आले.

पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी केवळ पाच दहा मिनिटे आधी ठाकरे गटाने घाईघाईत ६५ उमेदवारांची जाहीर केलेली यादी मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली. आघाडीतील दोन प्रमुख पक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात सर्वाधिक जागा मिळवण्यासाठीचा सुरू असलेला खटाटोप थांबण्याची चिन्ह दिसत नसल्याने तिन्ही पक्षांनी समान जागांवर निवडणूक लढविण्याचा रामबाण उपाय योजल्याचे बोलले जाते. ही मात्रा सर्वच घटक पक्षांना मान्य झाली असली तरी उर्वरित ३३ जागांचे वाटप हे आघाडीसमोरील मोठे आव्हान असेल.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘मविआ’ची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर मविआची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

संजय राऊत म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे जागावाटप अत्यंत सुरळीत पार पडले आहे. तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५ अशा २५५ जागा लढवतील. उर्वरित जागांवर मित्रपक्षांना सामावून घेतले जाणार आहे. मित्रपक्षांसोबत मविआचे नेते उद्यापासून (ता.२४) चर्चा सुरू करणार आहेत. त्यांच्यासोबतही आवश्यक वाटल्यास काही जागांची अदलाबदल होण्यास वाव आहे,’ असे राऊत यांनी स्पष्ट केले. उद्याच्या बैठकीला समाजवादी पक्ष, माकप, भाकप, शेकापलाहा बोलाविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याविषयी बोलताना विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर म्हणाले, “ महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार असल्याने तिच्या उमेदवार यादीला एवढा विलंब होतो आहे. आम्हाला प्रत्येक उमेदवाराची काळजीपूर्वक निवड करावी लागेल. उमेदवार यादी निश्चित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. घटक पक्षांमध्ये कोणताही वाद नाही. सध्या सर्व काही सुरळीत सुरू आहे.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter