केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात येतो. २०२५साठी पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून यामध्ये एकूण १३९ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
दरवर्षी हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील नागरिकांना दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार वितरण सोहळा मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षीच्या पद्म पुरस्काराच्या यादीत ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये २३ महिलांचा आणि काही मुस्लिम व्यक्तींचा देखील समावेश आहे.
महाराष्ट्रातून १४ जणांना पुसरकर
या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एकूण १४ व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये मनोहर जोशी, पंकज उधास आणि शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कला क्षेत्रात भरीव योगदान दिल्यामुळे पाच जणांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये अच्युत पालव, अशोक सराफ, अश्विनी भिडे देशपांडे, राजेंद्र मुजुमदार आणि वासुदेव कामत यांचा समावेश आहे. तर अरुंधती भट्टाचार्य यांना व्यापार आणि उद्योगासाठी, चैतराम देवचंद पवार यांना समाजसेवेसाठी, जसपिंदर नरुला यांना गायनासाठी, मारुती चितमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देण्यासाठी, सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रासाठी, डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे.
या मुस्लिम व्यक्तींचा सन्मान
१. शेखा एजे अल सबा
कुवेतमध्ये राहणारी शेखा ही प्रसिद्ध योगगुरु आहे. २००१मध्ये तिने योगा करण्यास सुरुवात केली होती. २०१४मध्ये तिने कुवेतमध्ये पहिले मान्यता प्राप्त योग स्टुडिओ ‘दरात्मा’ या नावाने सुरू केला आहे. कुवेतमध्ये योगशिक्षणाची चळवळ सुरू करण्यात शेखाचे महत्वपूर्ण योगदान आहे. तिने १४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शेम्स यूथ योग (२०१५ -२०२१ ) हा अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. आखाती देशात योग वाढवण्यासाठी तिने योगदान दिले आहे. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत दौऱ्यावर असताना शेखाची भेट घेतली होती.
२. सैयद ऐनुल हसन
सैयद ऐनुल हसन यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९५७ रोजी इलाहाबादमध्ये झाला. ते जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या भाषा, साहित्य आणि संस्कृती अभ्यासाचे पूर्व प्राध्यापक होते. सैयद ऐनुल हसन यांनी कश्मीर विश्वविद्यालय, JNU आणि कॉटन कॉलेज स्टेट विश्वविद्यालयासाठी सिलेबस तयार केले आहेत. सध्या ते मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विश्वविद्यालयाचे उपकुलपती आहेत. २०१७मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. सैयद ऐनुल हसन यांना आता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
३. बेगम बतूल
बेगम बतूल या राजस्थानमधून येतात. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा विवाह फिरोज खान यांच्याशी झाला. त्या मीरासी समुदायाच्या गायिका आहेत. भारतासह इतर देशातही त्यांची मांड गायकी खूप प्रसिद्ध आहे. मुस्लिम असतानाही बेगम बतूल भगवान राम आणि भगवान गणेश यांच्या भजनांचे गायन करतात. शास्त्रीय संगीताला एका ऊंचीपर्यंत नेण्यात त्यांचेदेखील योगदान आहे.
बेगम बतूल गेल्या ५ वर्षांपासून पॅरिसमधील युरोपच्या सर्वात मोठ्या होळी महोत्सवात त्यांची कला सादर करीत आहेत. परदेशातही अनेक वेळा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. फ्रान्स आणि ट्यूनिशिया सरकारांनीही त्यांना सन्मानित केले आहे. बेगम बतूल यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ट्यूनिशिया, इटली, स्वित्झर्लंड आणि जर्मनीतही आपले गायन सादर केले आहे.
४. फारूक अहमद मीर
फारूक अहमद मीर हे जम्मू काश्मिरमधील कलाकार आहेत. त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि जतन करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच त्यांनी आपल्या कलेतून नंदनवनाची संस्कृती पसरवण्याचे काम केले आहे.
उर्दू शायर शीन काफ निजाम यांनादेखील पद्म पुरस्कार
शीन काफ निजाम हे प्रसिद्ध अंतरराष्ट्रीय कवी आहेत. ते उर्दू भाषेतून कविता करत असून साहित्यिक विद्वान आहे. त्यांनी देवनागरीतील कवींच्या अनेक खंडांचे संपादन केले आहे. यामध्ये दीवान-ए-गालिब आणि दीवान-ए-मीर यांचा समावेश आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर ते म्हणतात, “उर्दू ही कोणत्याही धर्माची विशेष भाषा नाही असे मी मानतो. साहित्य एक आहे. यामध्ये विविध भाषांचा समावेश आहे. कोणत्याही पुरस्कारासाठी न लिहत लेखक त्यांच्या मनातीलभावना लिहीत असतात.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter