न्याययंत्रणेचे काम आता होणार वेगवान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 d ago
सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

 

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग युक्तिवादांचे लिप्यंतर (एका लिपीतील किंवा लेखनपद्धतीतील मजकुराचे दुसऱ्या लिपीतील किंवा लेखनपद्धतीतील मजकुरात रूपांतर करणे) करण्यासाठी तंत्रज्ञान वापरले जात आहे. AI सहाय्यित लिप्यंतरित युक्तिवाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. यासोबतच न्यायालयाने काल झालेल्या नियमित सुनावणीच्या दिवशीही युक्तिवादांचे लिप्यंतर करण्याचा विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी विभागाने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरसोबत समन्वय साधून AI आणि ML आधारित साधनांचा वापर न्यायालयीन निकालांचे इंग्रजीतून १८ भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी केला आहे. या भाषांमध्ये आसामी, बंगाली, गारो, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, खासी, कोंकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संथाली, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश आहे. हे भाषांतरित निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या eSCR पोर्टल वर उपलब्ध असणार आहेत. अशी माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तराद्वारे दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी विभागाने IIT मद्रासच्या सहकार्याने AI आणि ML आधारित साधने विकसित केली आहेत. ही साधने इलेक्ट्रॉनिक फाइलिंग सॉफ्टवेअरमध्ये एकत्र करण्यात आली आहेत. यामुळे दाखल केलेल्या प्रकरणांतील दोष (Defects) शोधणे सोपे होणार आहे. याचा प्रयोग म्हणून २०० नोंदणीकृत वकिलांना या प्रणालीचा वापर करण्यास आणि त्यावर अभिप्राय देण्यास संधी देण्यात आली आहे. यामुळे न्याय मिळवण्याचा हक्क आणि न्यायप्रशासनाच्या प्रक्रियेत सुधारणा होईल.

IIT मद्रासच्या सहकार्याने सर्वोच्च न्यायालय AI आणि ML च्या मदतीने दोष सुधारणा, डेटा आणि मेटाडेटा काढणे यासंदर्भात संशोधन करत आहे. ही AI आणि ML आधारित साधने इलेक्ट्रॉनिक फाइलिंग प्रणाली आणि प्रकरण व्यवस्थापन प्रणाली मध्ये एकत्र केली जाणार आहेत.

न्यायालयीन निर्णय प्रक्रियेत AI चा वापर नाही
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, न्यायालयाच्या निर्णय प्रक्रियेसाठी कोणतेही AI किंवा ML आधारित साधन वापरले जात नाही. AI फक्त सहाय्यक प्रणाली म्हणून कार्यरत राहील.

सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court Portal Assistance in Court Efficiency नावाची एक AI आधारित प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. ही प्रणाली न्यायालयीन प्रकरणांची तथ्यात्मक माहिती समजून घेणे, पूर्वीच्या निर्णयांचा शोध घेणे आणि प्रकरणे ओळखणे यासाठी मदत करेल. सध्या ही प्रणाली प्रायोगिक टप्प्यात आहे. त्यासाठी ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (GPU) आणि टेन्सर प्रोसेसिंग युनिट (TPU) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण झाल्यानंतरच तिचा वापर सुरू होईल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter