वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) कार्यकाळ अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत वाढवला जाणार आहे. - 'जेपीसी'चा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत असून मसुदा अहवालावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी घेतलेल्या आक्षेपानंतर कार्यकाळ वाढीसाठी - मंजुरी घेणारा प्रस्ताव उद्या (ता. २८) 'जेपीसी'चे अध्यक्ष जगदंबिकापाल व खासदार दिलीप सैकीया मांडतील, असे सूत्रांनी सांगितले.
वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या छाननीसाठी नेमलेल्या 'जेपीसी'ची आज बैठक झाली. समितीचा मसुदा अहवाल तयार असल्याचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याकडून सांगण्यात आले होते. यावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज जोरदार आक्षेप घेतला. यामुळे बैठकीत गदारोळ झाला. समितीचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपणार असल्याने एवढ्या अल्पकालावधीत अंतिम अहवाल सादर करणे शक्य होणार नसल्याचे या सदस्यांचे म्हणणे होते.
वक्फ विधेयकावर मुस्लिम संघटना, राज्य सरकारांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी समितीने बिहार, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांचा दौरा केलेला नसल्याचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे म्हणणे होते. तर 'आप'चे खासदार संजय सिंह यांनीही सर्व संबंधित घटकांचे म्हणणे ऐकले जात नाही तोपर्यंत जेपीसीने अहवाल सादर करू नये, अशी भूमिका घेतली. या मुद्द्याला भाजपच्या खासदारांकडूनही पाठिंबा मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. या घटनाक्रमानंतर, 'जेपीसी'चा कार्यकाळ अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढविण्याची मागणी करणारा प्रस्ताव गुरुवारी लोकसभेमध्ये मांडला जाणार असून कार्यक्रम पत्रिकेमध्ये या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter