पंजाबच्या मलेरकोटला जिल्ह्यातून सामाजिक आणि धार्मिक सौहार्दाचे उदाहरण समोर येत आहे. नुकतेच अमरगढजवळील उमरपुरा गावचे माजी सरपंच सुखजिंदर सिंग नोनी यांनी गावातील मुस्लिम समाजाला मस्जिदसाठी जमीन दान केली आहे. यामुळे सुखजिंदर सिंग यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. गावातील नागरिकांच्या, समुदायाच्या समस्या सोडवणे त्याचे कर्तव्य असते. सिंग यांनी हेच कर्तव्य पार पाडले आहे.
१९४७मध्ये भारत आणि पाकिस्तान ही दोन वेगळी राष्ट्र घोषित करण्यात आले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचे स्थलांतर झाले. परंतु काही मुस्लिमांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. मलेरकोटला जिल्ह्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. उमरपूरा गावाचे सरपंच सुखजिंदर सिंग याविषयी बोलताना म्हणतात, “देशाचे विभाजन झाल्यानंतर बहुसंख्य मुस्लिमांनी पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारतात राहणे पसंत केले. ते बॉर्डर पलीकडे गेले नाहीत. यामुळे गावात आणि जिल्ह्यात मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.”
पुढे ते म्हणतात, “माझ्या उमरपुरा गावात मुस्लिम समाजासाठी मस्जिद नाही. गावात ३० टक्के मुस्लिम आहेत. त्यांना नमाजसाठी गावातून बाहेर जावे लागत होते. मुस्लिमांसाठी मस्जिद असावे अशी माझी आणि गावातील नागरिकांची भावना होती. म्हणून मी आणि माझ्या भावाने मस्जिद बांधण्यासाठी आमची काही जमीन देण्याचे ठरवले.”
मुस्लिम झाले भावूक
सिंग कुटुंबाने मस्जिद बांधण्यासाठी मुस्लिम समाजाला ३६०० स्के. फुट जमीन दान केली आहे. सरपंच सिंग म्हणतात, “दान केलेल्या या जमिनीवर रविवारी (१२ जानेवारी) मुस्लिम बांधण्यासाठी पहिली वीट रचण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मस्जिदचे काम पूर्ण होईल आणि मुस्लिम बांधवांसाठी मस्जिद तयार होईल. म्हणून गावातील मुस्लिम समाज आनंदित असून काही अंशी भावुक झाला आहे.”
मस्जिदसाठी ‘इतक्या’ रुपयांची जमीन दान
मस्जिदसाठी दान केलेल्या जमीनिविषयी माहिती देताना सुखजिंदर सिंग म्हणतात, “ही जमीन सुमारे सात ते आठ लाख रुपयांची आहे. मुस्लिमांना मस्जिदसाठी मदत करण्याचे वचन आम्ही दोन्ही भावांनी दिले होते. मस्जिदसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे आता गावातील कोणत्याही मुस्लिमाला नमाजसाठी गावाच्या बाहेर जाण्याची गरज उरणार नाही. याचा आम्हाला आनंद आहे.”
याविषयी बोलताना शाही इमाम म्हणतात, “लवकरच गावातील मुस्लिम याच मस्जिदमध्ये नमाज अदा करतील. मात्र नमाज अदा केल्याचा सवाब मुस्लिमांसोबत आणि सिंग कुटुंबाला मिळेल. कारण मस्जिद बनवण्यासाठी सिंग कुटुंबाने त्यांची जमीन दिली आहे.”
अमरगढमधून विधनसभेची निवडणूक लढलेले कॉंग्रेसचे नेते स्मित सिंग या संपूर्ण प्रकरणाविषयी बोलताना म्हणतात, “मस्जिदसाठी आपली जमीन देऊन सिंग कुटुंबाने सर्वांना मानवतेचा संदेश दिला आहे. गंगा-जमुना तहजिब काय असते हे दाखवले आहे. मी त्यांचे आभार मानतो. तसेच मस्जिदसाठी सिख बांधवांनी देखील मोठी मदत केली आहे. यामध्ये तेजवंत सिंग याने दोन लाख रुपये आणि रविंदर सिंग ग्रेवाल यांनी एक लाख रुपये दिले आहेत.”