नवे वर्ष लष्करी सुधारणांचे राहणार-संरक्षण मंत्रालय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्रालयाच्या  सर्व सचिवांसह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्रालयाच्या सर्व सचिवांसह

 

संरक्षण मंत्रालयाने नवे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे. सायबर अन् अवकाश युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, रोबोटिक्स, हायपरसोनिक टेक्नोलॉजी यांसारख्या नव्या क्षेत्रांवर तसेच वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानावर नव्या वर्षात लक्ष केंद्रित केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. लष्कराचे आधुनिकीकरण, लष्करी क्षमतेचा विकास आणि अधिग्रहण प्रक्रियेत सुलभता आणण्यासह इतर मुद्द्यांवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

तांत्रिकदृष्ट्या प्रगत, प्रत्येक प्रकारचेआणि स्तरावरचे युद्ध हाताळण्याची क्षमता असलेले सैन्यबळ तयार करण्याचे लष्कराचे उद्दिष्ट आहे. व्यापक सुधारणांमुळे लष्कराच्या निर्णय प्रक्रियेत तत्परता येणार असल्याचे सिंह यांनी बैठकीदरम्यान नमूद केले. संरक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सार्वजनिक व खासगी तत्त्वावर प्रकल्पांची उभारणी होणे गरजेचे असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. संरक्षण क्षेत्राची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहे.
 
दशकभरापूर्वी दोन हजार कोटी रुपयांवर असलेली भारताची संरक्षण निर्यात आता २१ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. वर्ष २०२९ पर्यंत निर्यातीचा आकडा ५० हजार कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचेही सिंह यांनी या बैठकीदरम्यान स्पष्ट केले.