राष्ट्रपती भवनातील 'या' सभागृहांचीही बदलली नावे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

राष्ट्रपती भवनातील ‘दरबार हॉल’चे ‘गणतंत्र मंडप’ तर ‘अशोक हॉल’चे ‘अशोक मंडप’ असे नामांतर करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाकडून गुरुवारी ही माहिती देण्यात आली. विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये केले जाते.

भारतात प्राचीन काळापासून स्वातंत्र्याचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसून येते. त्यामुळे दरबार हॉलला ‘गणतंत्र मंडप’ हे नाव देणे समर्पक ठरते, असे राष्ट्रपती भवनाने निवेदनात म्हटले आहे. भाषेत एकरूपता आणणे आणि इंग्रजीकरणाची छाप मिटविण्यासाठी अशोक हॉलचे ‘अशोक मंडप’ असे नामांतर करण्यात आले आहे,’ असेही निवेदनामध्ये म्हटले आहे. 

‘‘सर्व कष्ट आणि दु:खापासून मुक्त असलेली व्यक्ती म्हणजे अशोक..’ हीच या शब्दाची व्याख्या आहे. याशिवाय सम्राट अशोकाच्या अनुषंगाने ‘अशोक’ शब्द सर्वपरिचित आहे. ‘अशोक’ हा एकता आणि शांततामय सहअस्तित्वाचे प्रतीक आहे.

देशाचे राष्ट्रीय चिन्हही सारनाथमधील ‘अशोक स्तंभा’वरूनच घेण्यात आले आहे,’’ असे निवेदनात म्हटले आहे. ‘अशोक’ हा शब्द अशोक वृक्षाच्या संदर्भातही वापरला जातो. या वृक्षाचे भारतीय धार्मिक परंपरा, कला आणि संस्कृतीमध्ये मोठे महत्त्व आहे,’ असे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे. काँग्रेसने या नामांतरावर टीका केली आहे.‘दरबार’ची कोणतीही संकल्पना नसली तरीसुद्धा ‘शहेनशाह’ची वेगळी संकल्पना असल्याचा टोला काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी- वद्रा यांनी लगावला आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter