सर्वांत उंचावरील 'हे' मतदान केंद्रही झाले सज्ज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांचे पथक,
मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांचे पथक,

 

रायरेश्वर (ता. भोर) हे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवरील मतदान केंद्र असून, रायरेश्वर किल्ल्यावरील मतदान केंद्राकडे जाण्यासाठी सर्व कर्मचान्यांना किल्ल्याच्या पायथ्याशी सोडण्यात आले. येथून सर्व साहित्य डोक्यावर घेऊन कर्मचान्यांना दोन तास चालत जावे लागले, यामध्ये केंद्राध्यक्ष अशोक भुजबळ यांच्यासह कन्हैयाबाई ओमदास, सुनील जाधव, क्षितिजा मोरे व गोपाळ जंगम आदींचा समावेश आहे. रायरेश्वर मतदान केंद्रावर मतदारांची संख्या १६० आहे तर बुरुडमाळ मतदान केंद्रावर मतदारांची संख्या ४२ आहे.

भोर तालुक्यातील सर्वांत उंचीवर असलेले रायरेश्वर येथील मतदान केंद्र (क्रमांक ५२३) हे २०३ भोर विधानसभा मतदारसंघातील अद्वितीय मतदान केंद्र (युनिक) आहे. भोरच्या अतिदुर्गम भागातील बुरुडमाळ येथील मतदान केंद्र (क्रमांक ४००) हे गंभीर (क्रिटिकल) स्वरूपाचे मतदान केंद्र असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली. भोर मतदार संघातील भोर शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयात सर्व महिला कर्मचारी असलेले गुलाबी मतदान केंद्र, भोलावडे येथील सर्व कर्मचारी दिव्यांग असलेले दिव्यांग मतदान केंद्र, मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथील ब्ल्यू रायडर पब्लिक स्कूलमधील मतदान केंद्र तरुण कर्मचारी असलेले मतदान केंद्र आहे. याशिवाय मुळशी तालुक्यातीलच बावधन बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र मॉडल मतदान केंद्र म्हणून ठरविण्यात आले आहे.

भोर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ विकास खरात म्हणाले," भोर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतराच्या बाहेर सर्व राजकीय पक्षांचे बूध ठेवण्यात येणार आहेत. मतदार केंद्राच्या २०० मीटर परिसरात कोणालाही मोबाईल किंवा इतर संपर्क साधने घेऊन जाण्यास परवानगी नाही. सर्व मतदार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील."