डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा
जगभरातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारी एक प्रभावशाली संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या 'मुस्लीम वर्ल्ड लीग'चे प्रमुख डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा 10 ते 15 जुलै दरम्यान भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांच्यासह वेगवेगळ्या वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता डॉ. अल-इसा हे दिल्लीतील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर येथे 'खुसरो फाऊंडेशन'ने आयोजित केलेल्या परिषदेत धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि माध्यमें यांच्या प्रतिनिधी यांच्यासह मेळाव्याला संबोधित करतील. अल-इसा सौदी अरेबियात कायदा आणि न्याय मंत्री असताना सौदी महिलांबाबत कायद्यात सुधारणा केल्या. डॉ. अल-इसा यांच्या कामाची पार्श्वभूमी पाहता ते यावेळी नेमस्त इस्लाम, संस्कृती संवाद, धार्मिक सहिष्णुता यांवर बोलतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय ते दहशतवादाविरोधातील लढा, धार्मिक वैविध्य यासोबतच आंतरधर्मीय संवादाची गरज यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील, असा कयास बांधला जात आहे.
पाच दिवसांच्या भारतभेटीत डॉ. अल-इसा अनेक ठिकाणी भेटी देणार आहेत, मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. जुम्माची नमाज दिल्लीतील जामा मस्जिद येथे अदा करतील. यानंतर ते ताजमहाललाही भेट देणार आहेत.
काय आहे मुस्लिम वर्ल्ड लीग (MWL)?
मुस्लिम वर्ल्ड लीग (MWL) ही जगभरातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारी एक प्रभावशाली संस्था आहे. सौदी अरेबिया आणि इतर अनेक मुस्लिम-बहुल देशांनी एकत्र येऊन 1962 मध्ये या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे मुख्यालय मक्का, सौदी अरेबिया येथे आहे. १२० हून अधिक देशांचे प्रतिनिधी या संघटनेचे सदस्य आहेत, ज्यामध्ये ६० हून अधिक मुस्लीम राष्ट्रे आहेत.
'मुस्लिमांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि इस्लामचा शांती संदेश जगभर पसरवणे' हे 'मुस्लिम वर्ल्ड लीग'चे प्रमुख ध्येय आहे. गरजू मुस्लिम समुदायांना मानवतावादी दृष्टीकोनातून तातडीची मदत मिळवून देणे, आंतरधर्मीय संवादाला चालना देणे, अतिरेकी विचारांशी आणि दहशतवादाशी लढा देणे आणि शिक्षण आणि विकास प्रकल्पांना मदत करणे, अशा इतर मानवतावादी पैलूंवरही ही संघटना काम करते.
कोण आहेत डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा?
'मुस्लिम वर्ल्ड लीग'चे सरचिटणीस मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा हे सौदी अरेबियाचे इस्लामिक विद्वान आहेत आणि मध्यम इस्लामवर एक प्रमुख आवाज आहेत. 2016 मध्ये त्यांची महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते आंतरधर्मीय संवाद आणि जागतिक शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जातात. 'मुस्लिम वर्ल्ड लीग'चे प्रमुखपदी येण्याआधी त्यांनी सौदी अरेबियामध्ये न्यायमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
डॉ.अल-इसा हे 'सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल लीडरशिप'चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. सरकार, विश्वास, मीडिया, व्यवसाय आदि क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींची आणि नेत्यांचा भरणा असलेली ही संस्था आहे. जगासमोरील समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन ही मंडळी काम करतात.
विविध समुदायांमध्ये परस्परांवरील विश्वास वाढवा, राष्ट्राराष्ट्रांमधील संबंध अधिक मजबूत व्हावेत यांसाठी अल-इसा नेहमीच पुढाकार घेत आले आहेत. अतिरेकी विचार आणि दहशतवाद यांचे ते प्रखर टीकाकार आहेत. इस्लामच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात ते कायम आग्रही भूमिका घेत असतात. 'इस्लाम हा शांतता आणि सहिष्णुतेचा धर्म आहे. आणि त्याचा हा खरा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे', अशी त्यांची भूमिका आहे.
डॉ. अल-इसा हे जेद्दाहमधील मदिना विद्यापीठ आणि किंग अब्दुल अजीझ विद्यापीठाचे पदवीधर आहेत. 2009 ते 2016 या काळात त्यांनी सौदी अरेबियात न्यायमंत्री म्हणून काम केले. आंतरधर्मीय संवाद आणि जागतिक शांतता यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
डॉ.अल-इसा यांची भारतभेट महत्त्वाची का?
डॉ. अल-इसा यांच्या भारतभेटीमुळे सौदी अरेबियातील प्रभावशाली इस्लामिक विद्वान आणि सुधारणावादी यांच्याशी संवाद साधण्याची संधी भारताला मिळणार आहे. सोबतच धार्मिक सलोखा, शांतता आणि सहकार्य अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरही यानिमित्ताने चर्चा होऊ शकते. भारतातील उच्चस्तरीय अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबतच्या त्यांच्या प्रस्तावित बैठकीमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध आणखी दृढ होण्यास मदत मिळेल.
सध्या सौदी अरेबियामध्ये सुधारणांचे वारे वाहते आहे. यामुळे जगाला इस्लामी विचार आणि प्रबोधनाची परंपरा यांची जगाला नव्याने ओळख होत आहे. संयुक्त राष्ट्र आणि जगातील प्रमुख राष्ट्रांनी या बदलाचे कौतुक केले आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे या क्रांतीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहात आहेत. डॉ. अल- इसा हे मोहम्मद बिन सलमान यांच्या अगदी जवळचे मानले जातात. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील राजकीय आणि राजनैतिक संबंधांसोबतच सामाजिक-सांस्कृतिक संबंधही नक्कीच दृढ होतील.