महाराष्ट्रातील टेक्स्टाईल उद्योगाचं भवितव्य उज्ज्वल - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 16 h ago
पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२० सप्टेंबर २०२४) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विविध महत्त्वाचे विकास प्रकल्प आणि योजनांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी वर्ध्यातील कार्यक्रमात त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात करत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला नमस्कार केला आणि महात्मा गांधी व विनोबा भावेंच्या भूमीची आठवण करून दिली, जिथून गांधीजींनी अस्पृश्यतेविरोधात लढा दिला होता. मोदींनी या पवित्र भूमीवरून विश्वकर्मा योजनेच्या यशस्वीतेचं कौतुक करत परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर भर दिला.

पीएम मित्रा पार्क: आर्थिक क्रांतीचं पाऊल
अमरावतीतील पीएम मित्रा पार्कच्या उभारणीसंदर्भात मोदींनी सांगितलं की, हा प्रकल्प विकसीत भारताच्या संकल्पनेला गती देणार आहे. त्यांनी नमूद केलं की, या टेक्स्टाईल पार्कमुळे ८ ते १० हजार कोटींची गुंतवणूक होईल आणि हजारो रोजगारांची निर्मिती होईल. यामुळे कापसाला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांचं आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट: सन्मान, सशक्तीकरण, समृद्धी
पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं की, विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट सन्मान, सशक्तीकरण आणि समृद्धी हे आहे. योजनेअंतर्गत देशातील ७०० पेक्षा अधिक जिल्हे आणि अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायतींनी अभियानाला गती दिली आहे. वर्षभरात २० लाख लोक या योजनेत सहभागी झाले असून ८ लाख कारागीरांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात ७ हजार कारागिरांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे आणि साडेसहा लाखांहून अधिक लोकांना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

मागासवर्गीय समाजाचं सक्षमीकरण
मोदींनी आपल्या भाषणात एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणावर जोर दिला. ते म्हणाले, “आमच्या सरकारने विश्वकर्मा समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी पाऊल उचललं आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील कारागिरांना झाला आहे.” ते पुढे म्हणाले की, या समाजातील मंडळी केवळ कारागीर न राहता आता उद्योजक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

विकासाचा मंत्र
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाचा शेवट करताना सांगितलं की, “महाराष्ट्रातील टेक्स्टाईल उद्योगाचं भवितव्य उज्ज्वल आहे. महाविकास आघाडीने या उद्योगाला दुर्लक्षित केलं असलं तरी, आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे हा क्षेत्र अधिक प्रगती करत आहे.”

असा आहे प्रधानमंत्री मोदी यांचा दौरा  
१. PM Vishwakarma योजना: ही योजना परंपरागत हस्तकला कामगार आणि कारागीरांना सबलीकरण देण्यासाठी आहे. दौऱ्यात मोदी विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करतील आणि त्यांना कर्ज सुविधाही प्रदान करतील, ज्यामुळे छोटे व्यवसाय उभे राहतील.

२. मेगा टेक्सटाईल पार्क, अमरावती: या पार्कचे उद्घाटन १०२० एकर जमीनावर होणार आहे. हा प्रकल्प भारतातील वस्त्रोद्योगाला मोठे चालना देणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण करणार आहे.

३. पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना: या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना समर्थन देणे आहे, ज्यामुळे महिला स्वावलंबी होऊ शकतील. पंतप्रधान या योजनेंतर्गत महिलांना स्टार्टअपसाठी आर्थिक सहाय्य आणि व्यवसाय संधींना प्रोत्साहन देणार आहेत.

४. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र: हे केंद्र तरुणांना रोजगारक्षम कौशल्ये शिकवून, त्यांना आधुनिक औद्योगिक जगात सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट ठरवते. हे केंद्र महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठे शैक्षणिक आणि व्यावसायिक साधन ठरणार आहे.