सायबर फसवणूकीचा आकडा ११ हजार कोटींच्या पार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

देशात चालू आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यांमध्ये विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांद्वारे अंदाजे ११.३३३ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आयफोरसी) या गृह मंत्रालयाच्या विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या कालावधीत देशभरात सायबर गुन्ह्यांच्या पाच लाख तक्रारी दाखल झाल्या असून, सर्वाधिक फसवणूक शेअरमधील गुंतवणुकीच्या गुन्ह्यांद्वारे झालो असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक लोकांनी तक्रारी दाखल केलेल्या नसल्याने फसवणुकीचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. 

भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सायबर फसवणुकीपैकी सर्वाधिक ४६३६ कोटी रुपयांची फसवणूक शेअरमधील गुंतवणुकीच्या गुन्ह्यांद्वारे झाली आहे. याबाबत दोन लाख २८ हजार ९४ तक्रारी दाखल झाल्या आहेत, तर अन्य गुंतवणूक आधारित घोटाळ्यांबाबत एक लाख ३६० तक्रारी दाखल झाल्या असून, त्याद्वारे ३२१६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. डिजिटल अरेस्टच्या ६३ हजार ४८१ तक्रारी दाखल झाल्या असून, त्याद्वारे १६१६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे या आकडेवारीवरुण स्पष्ट झाले. 

सिटीझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टीमकडीच सीएफसीएफआरएमएस आकडेवारीनुसार, वर्ष २०२४ मध्ये सायबर फसवणुकीच्या जवळपास१२ लाख तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ४५ टक्के तक्रारी कंबोडिया, म्यानमार आणि लाओस आदी दक्षिणपूर्व आशियाई देशांतून झालेल्या फसवणुकीच्या आहेत. 

या वर्षी सायबर फसवणुकीच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे, की चोरीचे पैसे अनेकदा धनादेश, सेंट्रल बैंक डिजिटल चलन (सीबीडीसी), फिनटेक क्रिप्टो, एटीएस, व्यापारी पेमेंट आणि इन्वॉलेट वापरून काढले जातात. गेल्या वर्षभरात, आयफोरसीने अशा व्यवहारांसाठी वापरली जाणारी सुमारे ४.५ लाख बैंक खाती गोठवली आहेत.

'सीएफसीएफआरएमएस'कडे तक्रारी 

'सीएफसीएफआरएमएस'ने २०२१ मध्ये स्थापना झाल्यापासून ३०.०५ लाख तक्रारी नोंदवल्या असून, एकूण २७,११४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्ष २०२३ मध्ये ११ लाख ३१ हजार २२१ तक्रारी नोंदविण्यात आल्या, तर वर्ष २०२२ मध्ये पाच लाख १४ हजार ७४१ आणि २०२१ मध्ये एक लाख ३५ हजार २४२ तकारी नोंदवण्यात आल्या, असे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter