महाराष्ट्राची संस्कृती एकोप्याची - हुसेन दलवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
कॉँग्रेसचे नेते हुसेन दलवाई.
कॉँग्रेसचे नेते हुसेन दलवाई.

 

बुलडोजरचे द्वेषाचे राजकारण उत्तर प्रदेशात ठीक आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शिवरायांनी सर्वधर्मीयांना जवळ केले. येथील संस्कृती जातीयवादी, बुलडोजरची नाही तर एकोप्याची आहे," असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सत्यशोधन समितीचे सदस्य हुसेन दलवाई यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. उत्तर प्रदेशचे राजकारण महाराष्ट्रात आणले जात आहे का, असा सवालही त्यांनी केला.

नागपूरमधील हिंसाचार झालेल्या भागात दलवाई यांनी भेट देऊन नागरिकांसोबत चर्चा केली. काही एनजीओ, पत्रकार, समाजसेवकांची त्यांनी भेट घेतली. येथे घडलेला घटनाक्रम त्यांनी जाणून घेतला. यावेळी ते म्हणाले, "उत्तर प्रदेशचे द्वेषाचे राजकारण महाराष्ट्रात आणू नये. अनधिकृत बांधकामावर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमात राहून कारवाई करावी. ती फक्त ती विशिष्ट समाजासाठी राहू नये. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा हिंसाचार होतो. त्या ठिकाणी मी जातो. भेटी देऊन समाजात सौहार्द राहावा, शांतता राखावी यासाठी प्रयत्न करतो. हिंसाचारात चादर जाळण्यात आली, त्यामुळे भावना भडकल्या असे समजले. अशा आंदोलनात पोलिस हस्तक्षेप करतात. जाळपोळ करायला परवानगी देत नाहीत. पोलिसांनी चादर जाळण्यास कशी परवानगी दिली," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत हुसेन दलवाईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली. त्याने भाऊ दारा शिकोहची ज्या प्रमाणे हत्या केली, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. मनुस्मृतीप्रमाणे हत्या कशी करावी, याबाबत पंडितांनी त्याला सांगितले होते. त्यानुसार त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, असा दावा त्यांनी केला.

बुलडोजरचे कारवाई नियमबाह्य - उच्च न्यायालय 
नागपूर हिंसचारातील ५१ आरोपींच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्याची मोहीम नागपूर महापालिकेने हाती घेतली होती.  २४ मार्चला महापालिकेने दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान याचे घर पाडले. या दरम्यान त्याच्या आईने कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईवर ताशेरे ओढून ती नियमबाह्य असल्याचे सांगितले. सोबतच पंधरा दिवसांच्या आता उत्तर दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter