काश्मीरमधील दहशतवादाला गाडून टाकू - गृहमंत्री शाह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही तो अशा रीतीने गाडून टाकू, की तो पुन्हा तोंड वर काढू शकणार नाही,’ अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी व्यक्त केला. किश्तवाडमधील पाडेर-नागसेनी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री सुनील शर्मा यांच्या प्रचारसभेस संबोधित करत होते. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)-काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शहा म्हणाले, की नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दहशतवाद्यांना सोडण्याचे आश्वासन दिले आहे. एका अर्थाने दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण केंद्रात मोदी सरकार आहे आणि त्या समोर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याची कोणाचीही ताकद नाही.

एका बाजूला नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि दुसऱ्या बाजूला भाजप अशा दोन शक्तींमध्ये ही निवडणूक होत आहे. एनसी-काँग्रेस म्हणत आहेत की आम्ही सरकार बनवले तर आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करू. मला सांगा अनुच्छेद ३७० पुन्हा येथे लागू करावे का? भाजपने पहाडी, गुज्जर आणि इतरांना दिलेले आरक्षण हिसकावून घेतले जाईल.

तुम्ही काळजी करू नका, मी काश्मीरमधील परिस्थितीवर माझे बारकाईने लक्ष आहे. ओमर अब्दुल्ला किंवा राहुल यांची आघाडी जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करू शकणार नाही याची खात्री बाळगा, असा विश्वासही शहा यांनी यावेळी व्यक्त केला. शहा यांचा गेल्या पंधरवड्यातील गृहमंत्र्यांचा जम्मू प्रदेशाचा हा दुसरा दौरा होता.

यापूर्वी ६ आणि ७ सप्टेंबर रोजी जम्मूच्या दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि कामगार अधिवेशनाला संबोधित केले होते. जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होत असलेल्या पाडेर-नागसेनीसह २४ विधानसभा मतदारसंघांतील प्रचाराचा सोमवार हा शेवटचा दिवस होता.