वाढत्या तापमानवाढीचा काश्मीरलाही फटका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

काश्‍मीर खोऱ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दहा दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेत शालेय विभागाने सुट्ट्यासंदर्भात रविवारी अधिसूचना जारी केली.

सर्व सरकारी आणि अनुदानप्राप्त खासगी शाळांना ८ जुलै ते १७ जुलैपर्यंत सुट्ट्‌या राहतील, असे आदेशात म्हटले आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या अहवालाचा संदर्भ घेत शिक्षण खात्याने दहा दिवस शाळांना सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतला. रविवारी कमाल तापमान ३२ अंशापर्यंत पोचले आणि हे तापमान सामान्यांपेक्षा ३.१ अंशापेक्षा अधिक आहे. तसेच किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस राहिले आहे.
 
मागील वर्षाच्या तुलनेत हे तापमान ४.५ अंश सेल्सिअस अधिक आहे. दरम्यान, जम्मूच्या शालेय विभागाच्या आदेशानुसार १६ जुलैपर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहतील. याप्रमाणे शाळा १७ जुलै रोजी सुरू होणार आहेत.

मे महिना सर्वाधिक उष्ण
श्रीनगर शहरात यंदाचा मे महिना सर्वाधिक उष्ण ठरला होता. या काळात तब्बल ११ वर्षांनंतर ३२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. यापूर्वी २०१३ मध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. यापूर्वीही श्रीनगर खोऱ्याने कमाल ३४ अंश तापमानाचा अनुभव घेतलेला आहे. २००१ मध्ये ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र यंदाचा मे महिना दहा वर्षांतील सर्वाधिक उष्ण राहिला होता. काझीगुंद, पहेलगाम, कुपवाडा, कोकेनर्ग, गुलमर्ग, गंदरबदल, अनंतनाग येथेही कमाल तापमानाने विक्रम केला आहे.