'टेली मानस'ने जपले लाखो भारतीयांचे मानसिक आरोग्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम (NTMHP) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या टेली मानस (Tele MANAS) या हेल्पलाईनने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या दोन वर्षांत हेल्पलाईनने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. १० ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू झालेल्या या हेल्पलाईनद्वारे आतापर्यंत १४.७ लाखांहून अधिक कॉल्स हाताळले गेले आहेत. या उपक्रमाद्वारे मानसिक आरोग्याच्या समस्यांवर मोफत मार्गदर्शन, सल्लामसलत आणि गरजेनुसार तज्ञांकडे रेफर करण्याची सेवा २४ तास उपलब्ध आहे. आता मोबाईल अ‍ॅप आणि व्हिडिओ सल्लामसलतीच्या माध्यमातून ही सेवा भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे. 

हेल्पलाईनद्वारे लोकांना मानसिक ताण-तणाव, चिंता, नैराश्य, आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी टेली मानस त्वरित मदत मिळू शकते. केंद्र सरकारने हा कार्यक्रम भारताच्या मानसिक आरोग्य क्षेत्रातील वाढत्या समस्यांना उत्तर देण्यासाठी सुरू केला होता. 

टेली मानसला देशभरात एकूण ४४ क्षेत्रीय केंद्रांद्वारे सहाय्य मिळत आहे. दररोज हजारो नागरिकांना मानसिक आरोग्य सेवांसाठी याद्वारे मदत केली जात आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता वाढवली गेली आहे आणि भारतातील आरोग्यसेवेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून याचे योगदान ओळखले जात आहे.

सर्वसामान्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर मानसिक आरोग्य सेवा पोहोचवल्यामुळे जागतिक आरोग्य संस्थांसह अनेकांकडून या उपक्रमाला प्रशंसा मिळाली आहे. भारतातील WHO प्रतिनिधी डॉ. रोडरिको एच. ओफ्रिन यांनी गेल्या दोन वर्षांतील या उपक्रमाच्या यशाबद्दल आरोग्य मंत्रालयाचे अभिनंदन केले. या कार्यक्रमामुळे मानसिक आरोग्याच्या समस्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे WHO ने अधोरेखित केले आहे.
 
 
असा करता येईल टेली मानसचा उपयोग
 
टेली मानसच्या https://telemanas.mohfw.gov.in/home या अधिकृत संकेतस्थळावर आपण या उपक्रमाची अधिक माहिती घेऊ शकता. याशिवाय टेली मानस हेल्पलाईनचे 14416 आणि 1-800 891 4416 असे दोन टोल फ्री नंबर आहेत. टेली मानसच्या समुपदेशकाशी बोलण्यासाठी तसेच मार्गदर्शन घेण्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करू शकता. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter