आठ्यातील मुघलकालीन ताजमहाल भारतीयच नव्हे तर परदेशी पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाकडे संरक्षित असलेल्या या स्मारकाने गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक २९७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत राज्यसभेत यांनी लेखी प्रश्नाचे उत्तर देताना शुक्रवारी ही माहिती दिली. गेल्या पाच वर्षांत विविध स्मारकांच्या प्रवेश तिकिटांच्या विक्रीतून 'एएसआय'ला किती उत्पन्न मिळाले याची माहिती वर्षनिहाय आणि स्मारकनिहाय द्यावी तसेच गेल्या पाच वर्षांत प्रवेश तिकिटांच्या विक्रीतून सर्वाधिक उत्पन्न मिळालेल्या स्मारकांबद्दल त्यांना विचारण्यात आले होते. शेखावत यांनी त्यांच्या उत्तरात आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष२०२३-२४ पर्यंतच्या आर्थिक वर्षांतील उत्पन्नाची माहिती दिली.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दिल्लीचा कुतुबमिनार आणि लाल किल्ला या पर्यटनस्थळांना तिकीट विक्रीतून अनुक्रमे २३ कोटी ८० लाख १६ हजार ९८३ रुपये आणि १८ कोटी आठ हजार लाख ९० हजार ८२५ रुपये उत्पन्न मिळाले. महसुलात ताज महालनंतर त्यांचा क्रमांक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.
हाच क्रम २०१९-२० मध्ये उलट होता. त्यावेळी आग्रा किल्ला दुसऱ्या व कुतुबमिनार तिसऱ्या स्थानी होता. २०२०-२१ मध्ये तमिळनाडूतील मामल्लपुरम येथील स्मारके आणि कोणार्कमधील सूर्यमंदिर यांचा क्रमांक अनुक्रमे दुसरा व तिसरा होता. पण उत्पन्नाच्याबाबतीत पाचही वर्षांत ताजमहाल प्रथम स्थानीच आहे.