मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर एनआयए कोठडीत त्याची रोज ८ ते १० तास कसून चौकशी केली जात आहे. ही चौकशी सुरू असताना राणाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. याशिवाय त्याला वकिलांची भेट घेण्याची परवानगी दिली जात आहे. दिल्लीतील न्यायालयाने राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावल्यानंतर राणाची वैद्यकीय तपासणी तसेच वकिलांची भेट घेण्यासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
२४ तास जवान तैनात
दहशतवादी तहव्वूर राणाला सीजीओ कॉम्प्लेक्समधील दहशतवादविरोधी संस्थेच्या मुख्यालयात अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या एका कोठडीत ठेवण्यात आले आहे. याठिकाणी चोवीस तास सुरक्षा जवान तैनात आहेत. एनआयएच्या चौकशी पथकाचे नेतृत्व मुख्य तपास अधिकारी जया रॉय करत आहेत. आतापर्यंत राणाने कोठडीत पेन, कागद आणि कुराण या तीनच वस्तूंची मागणी केली असून त्या त्याला पुरवण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानी वंशाचा कॅनडातील व्यावसायिक असलेल्या ६४ वर्षीय तहव्वूर राणा याच्या विरोधात जमा असलेल्या पुराव्यांच्या आधारे ही चौकशी होत आहे.यामध्ये राणाचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद गिलानी याच्याशी झालेल्या फोन कॉलचा समावेश आहे. हेडली अमेरिकी नागरिक असून तो तेथील तुरुंगात आहे.
गुन्ह्यातील सहभाग
हेडलीचे वडील पाकिस्तानी तर आई अमेरिकी नागरिक होती, अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर हेडली येथील तपास यंत्रणांना आशियायी देशांतून होणाऱ्या अमली पदार्थ तस्करी, तस्करांबाबत गोपनीय माहिती पुरवत असे. प्रत्यक्षात तो एकाचवेळी अमेरिका आणि पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनांच्या संपर्कात (डबल एजंट) होता, पाकिस्तानी मुल्हेर संघटना आयएमआय आणि लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेस हाताशी धरून त्याने मुंबई हल्ल्याचा कट आखला. 'फॉरेनर लूक'मुळे हेडलीवर मुंबई हल्ल्यासाठी संभाव्य ठिकाणे निवडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
भारतात वास्तव्यासाठी हेडलीने बालपणीचा मित्र राणाची मदत घेतली, राणाने वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिस या नावे चार देशांत केंद्र सुरू केली. त्यातील एक केंद्र हेतुपरस्सर मुंबईत सुरू करण्यात आले. या व्यवसायात भागीदार असल्याचे भासवून हेडली हल्ल्यापूर्वी आठ वेळा मुंबई, भारतात आला. या व्यवसायाआड हेडलीने अधिकाधिक मनुष्यहानी होईल या उद्देशाने हल्ल्यासाठी ठिकाणे निवडली. राणा आणि हेडली यांच्या मुंबईमध्ये वास्तव्यात दोघांमध्ये २३१ वेळा फोनवर बोलणे झाले. त्यापैकी हल्ल्याच्या आधी केलेल्या मुंबईतील वास्तव्यात दोघांमणो संर्वाधिक ६६ वेळा बोलणे झाल्याचा दावा एनआयएने प्रत्यार्पणासाठी अमेरिकेकडे सुपूर्द केलेल्या कागदपत्रांमध्ये केला होता.