नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ केडरची जहाल नक्षलवादी ताराक्कासह अकरा नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात आठ महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
शरण आलेल्यांमध्ये दोन दांपत्यांचाही समावेश आहे. या अकरा जणांवर महाराष्ट्रात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. छत्तीसगड सरकारनेसुद्धा त्यांच्यावर बक्षीस जाहीर केले होते. यामध्ये दंडकारण्य झोनल कमिटीची प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का यांचाही यात समावेश आहे.
ताराक्का ३४ वर्षांपासून नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय होती. याशिवाय ३ डिव्हिजन कमिटी मेंबर तर १ उपकमांडर, २ एरिया कमिटी मेंबर यांचाही शरण आलेल्यांमध्ये समावेश आहे. या सर्वांना पुढील जीवन जगण्यासाठी ८६ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सहा नक्षलवादी ठार झाले होते. मागील वर्षभरामध्ये २४ नक्षलवादी ठार झाले असून १८ जणांना अटक करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांत २७ जहाल नक्षलवादी शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात आले आहेत.
यांचा झाला सत्कार
मागील वर्षी १७ जुलै २०२४ रोजी पोलिसांच्या विशेष अभियान पथकातील जवानांनी छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावाजवळ जंगल परिसरात १२ जहाल नक्षलवाद्यांना ठार करून संपूर्ण उत्तर गडचिरोलीतील सर्व सशस्त्र नक्षलवाद्यांचे उच्चाटन केले. या कामगिरीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभियानात सहभागी 'सी-६०' जवानांना ५१ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. या बक्षिसाच्या रकमेतून जवानांना नक्षलविरोधी अभियानात उपयोगात येणाऱ्या साहित्यांच्या किटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विशेष अभियान पथकातील जवानांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोपर्शी चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनाही गौरविण्यात आले.
गर्देवाड्यात प्रथमच धावली एसटी
स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनी प्रथमच अहेरी ते गर्देवाडा या बससेवेचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. मुख्यमंत्र्यांनी त्या बसमधून प्रवासही केला. अतिदुर्गम पेनगुंडा येथील गडचिरोली पोलिस, 'सीआरपीएफ', 'एसआरपीएफ' व 'सी-६०' च्या जवानांसोबतही त्यांनी संवाद साधला. गडचिरोली येथील कार्यक्रमादरम्यान गडचिरोली पोलिस दलासाठी पवनहंस कंपनीच्या हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या हँगरचे उद्घाटनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter