महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या सुनील प्रभू आणि शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आजच्या सुनावणीला विशेष महत्त्वाचे मानले जात आहे, कारण १० नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड निवृत्त होत आहेत. त्यामुळे आज त्यांच्याकडून काही महत्त्वाचे निर्देश येण्याची शक्यता आहे.
या सुनावणीतून राज्यातील विधानसभा निवडणुकांवर प्रभाव पडू शकतो, अशी चर्चा देखील रंगली आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत असताना या सुनावणीमुळे ठाकरे गट आंणि शरद पवार गटाच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्ट काय निर्देश देईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेना अपात्रता प्रकरण
शिवसेना फुटीनंतर सुरू असलेल्या या अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ३९ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले नव्हते. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांनी या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी अशी मागणी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीवेळी याचिकेवर सुनावणी सुप्रीम कोर्टातच होईल, असा निर्णय दिला होता. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट यावर अंतिम निर्णय देते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले नसल्याने यावर आक्षेप घेतला आहे. या निर्णयाविरोधात जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात फूट पडल्यामुळे शरद पवार यांनी या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.