नागपूर हिंसा प्रकरणी महानगरपालिकेने आरोपींविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. कथित मास्टरमाइंड फहीम खान आणि आणखी एका आरोपीच्या घरावर सोमवारी सकाळी महापालिकेने बुलडोझरने कारवाई केली. महापालिकेने शुक्रवारी फहीम खानला नोटीस दिली होती आणि सोमवारी अतिक्रमणाची कारवाई केली.
या कारवाईनंतर फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. महानगरपालिकेच्या या कारवाईवर आता मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने स्थगिती दिली आहे. याशिवाय राज्याचे मुख्य सचिव यांना सर्वोच्च आदेशाच्या अवहेलना प्रकरणात जबाब नोंदविण्याचे निर्देश दिले.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
एखादी व्यक्ती गुन्ह्यातील आरोपी आहे म्हणून त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर बुलडोझरने पाडकाम करणे हे घटनाविरोधी असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राजस्थान व मध्य प्रदेशमधील अशा प्रकारच्या कारवायांविरोधात दाखल याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला होता.
मात्र सोमवारी सकाळी नागपूर हिंसेतील मुख्य आरोपी फहीम खान यांच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. अशी कारवाई घटनाविरोधी ठरवतानाच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला त्यासाठी दोषी धरले जावे, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले होते.
न्यायमूर्ती बी. आर. गवई व न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने नियमावली तयार करून दिली होती. उत्तर प्रदेशमध्ये दंगेखोरांची कंबर तोडण्यासाठी त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येते. त्यामुळे नागपुरातही दंगेखोरांच्या घरावर बुलडोजर चालणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता.
त्यावर ‘दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येईल,’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर महापालिकेने लगेच फहीम खानच्या कुटुंबीयांना अतिक्रमणबाबत नोटीस दिली होती. सोमवारी अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.