सुपरस्टार थलपती विजयकडून इफ्तारचे आयोजन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
चेन्नईतील इफ्तार पार्टीत थालापती विजय
चेन्नईतील इफ्तार पार्टीत थालापती विजय

 

सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर थालापती विजय यांच्या 'तमिळगा वेत्री काझगम' पक्षाकडून चेन्नईत एक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत विजयदेखील सहभागी झाला होता. राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यानंतर विजयने अभिनय क्षेत्र सोडले. 

विजयने मुस्लिम बांधवांसारखा संपूर्ण दिवस रोजा धरला होता.  या इफ्तार पार्टीत त्याने चेन्नईच्या मुस्लिम बांधवांसोबत रोजा सोडला. शिवाय मुस्लिम बांधवांसोबत मस्जिदमध्ये प्रार्थनादेखील केली. या कार्यक्रमात सहभागी होताना विजयने तेथील मुस्लिम बांधवांचा पेहराव परिधान केला होता. या कार्यक्रमात परिसरातील १५ मस्जिदींचे इमाम (मस्जिदमध्ये नमाज पढवणारे) आणि ३००० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. अभिनेता विजयच्या या कृतीने सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला आहे.  

या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये विजय नमाज अदा करताना आणि इफ्तार करताना दिसत आहे. विजयच्या या कृतीचे आणि सांस्कृतिक विविधता स्वीकारण्याच्या भावनेचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे. विजय यांच्या इफ्तार पार्टीला अनेक लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तर काहींनी यावर टीका केली आहे. 

तामिळनाडूमध्ये २०२६ ला विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे रमजान महिन्याच्या निमित्ताने मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. विजयने केलेली ही कृती जरी सामाजिक संदेश देत असली तरीही तो राजकारणात यशस्वी होण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter