सुफी परंपरेने भारतात निर्माण केली नवी ओळख - नरेंद्र मोदी

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 1 d ago
जहान-ए-खुसरो कार्यक्रमात सहभागी नरेंद्र मोदी
जहान-ए-खुसरो कार्यक्रमात सहभागी नरेंद्र मोदी

 

दिल्ली येथील सुंदर नर्सरी येथे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकार मुझफ्फर अली यांनी 'जहां-ए-खुसरो' या महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव तीन दिवसीय असून २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान पार पडणार आहे. काल या महोत्सवाला सुरुवात झाली. नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. 

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज ‘जहान-ए-खुसरो’मध्ये आल्यावर आनंदी होणे स्वाभाविक आहे. हजरत अमीर खुसरो ज्या वसंत ऋतूचे वेड होते तोच वसंत ऋतु या दिल्लीच्या हवेतच नाही तर ‘जहान-ए-खुसरो’मध्ये मिसळला आहे. हजरत खुसरोंच्या शब्दात सांगायचे झाले तर… 

सकल बन फूल रही सरसों, सकल बन फूल रही सरसों,
अम्बवा फूटे टेसू फूले, कोयल बोले डार-डार...

इथे खरोखरच असेच काहीसे वातावरण आहे. याठिकाणी येण्यापूर्वी मला तह बाजार फिरण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझी बाग-ए-फिरदौसमधील काही मित्रांसोबत भेट झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत दुआ-सलाम केला.” 

नुकतेच याठिकाणी 'नजर-ए-कृष्णा'सह इतर कार्यक्रम झाले. यावेळी कलाकारांना माईक सारख्या उपकरणाविषयी काही अडचणी आल्या. तरी त्यांनी त्यांची कला सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी त्यांचा आदर करतो. हा आनंद लुटण्यासाठी आलेल्यांची या घटनेमुळे निराशा झाली असावी. पण कधी कधी या घटना आयुष्यात अनेक गोष्टी शिकवतात. 

अशा संधी देशाच्या कला आणि संस्कृतीसाठी खूप महत्त्वाच्या असतात. ‘जहान-ए-खुसरो’ या कार्यक्रमाने २५ वर्ष पूर्ण केली आहेत. या २५ वर्षांमध्ये या कार्यक्रमाने लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. ही या कार्यक्रमाची सर्वात मोठी कामगिरी आहे. मी डॉ. कर्ण सिंग जी, मुजफ्फर अली जी, मीरा अली जी आणि इतर सहकार्यांना यासाठी शुभेच्छा देतो. ‘जहान-ए-खुसरो’चा हा कार्यक्रम यापुढेही बहरत राहो, यासाठी रूमी फाउंडेशनला आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रमजान महिना देखील  सुरू होत आहे. मी सर्व देशवासीयांना रमजानच्या शुभेच्छा देतो. आज मी सुंदर नर्सरीमध्ये आलो आणि हिज हायनेस प्रिन्स करीम आगा खान यांचीही आठवण आली. सुंदर नर्सरीला सजवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. जो लाखो कला प्रेमींना एक आशीर्वाद आहे असे मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, गुजरातमधील सूफी परंपरेचे 'सरखेज रोजा'एक मोठ केंद्र राहिले आहे. एक वेळ अशी होती की तेथे खूप वाईट परिस्थिती झाली होती. मी मुख्यमंत्री असताना, सरखेज रोजाच्या पुर्ननिर्माणासाठी खूप काम केले. खूप कमी लोकांना हे माहित असेल की एक काळ असा होता जेव्हा सरखेज रोजा येथे मोठ्या प्रमाणावर कृष्ण उत्सव साजरे केले जात होते. त्या उत्सवात असंख्य लोक सहभागी होऊन आनंद घेत होते. आजही इथे आम्ही सगळे कृष्ण भक्तीच्या रंगात रंगलो होतो. मी सरखेज रोजामध्ये होणाऱ्या वार्षिक सूफी संगीत कार्यक्रमात सुद्धा सहभाग घ्यायचे. सूफी संगीत एक असा सांस्कृतिक वारसा आहे जो आपण सर्वांनी एकत्र अनुभवलेला आहे. सूफी संगीत आपल्या परंपरेचा भाग बनला आहे. 

"जहान-ए-खुसरो" या कार्यक्रमात एक वेगळाच सुगंध आहे. हा सुगंध भारताच्या मातीचा आहे. या मातीला हजरत अमीर खुसरोने जन्नतच्या बागीच्यासारखी म्हटली होती. आपला भारत, तो जन्नतचा बगीचा आहे जिथे संस्कृतीचे सर्व रंग समृद्ध झाले आहेत. इथे सूफी परंपरा भारतात आली आणि तिने स्वतःला भारताच्या मातीशी जोडले. भारताच्या भव्यता आणि त्याच्या समृद्ध संस्कृतीची हजरत खुसरोंनी गोडगुलाबी गाण्यांमध्ये वाहवा केली आहे असही ते  म्हणाले. 

हजरत खुसरोंच्या प्रसिद्ध काव्यांमध्ये एक मोठी पंक्ति आहे 

 "बन के पंछी भए बावरे, बन के पंछी भए बावरे,
 ऐसी बीन बजाई सँवारे, तार तार की तान निराली,
 झूम रही सब वन की डारी।"

भारतामध्ये सूफी परंपरेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सूफी संतांनी स्वत:ला फक्त मस्जिद किंवा खानकाहांपुरते मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी पवित्र कुराणाचे शब्द वाचले तर वेदांचे स्वर देखील ऐकले. त्यांनी अजानच्या आवाजात भक्ति गीतांची गोडी मिसळली आणि म्हणूनच उपनिषदांमध्ये  संस्कृतमध्ये एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति असं म्हटलं होतं, तेच हजरत निजामुद्दीन औलियांनी "हर कौम रास्त राहे, दीने व किब्‍ला गाहे" अशा सूफी गाण्यांद्वारे सांगितले. वेगवेगळ्या भाषा, शैली आणि शब्द वापरले गेले असले तरी संदेश तोच होता. मला आनंद आहे की आज "जहान-ए-खुसरो" त्या परंपरेची एक आधुनिक ओळख बनली आहे.

कोणत्याही देशाची संस्कृती, त्याचा शिष्टाचार त्याच्या स्वरांमध्ये, त्याच्या गाण्यात, संगीतामध्ये व्यक्त होते. ती त्याच्या अभिव्यक्तीच्या कलेतून बाहेर येते. हजरत खुसरो म्हणत, भारताच्या या संगीतामध्ये एक समोहन आहे. एक असा समोहन आहे की जंगलात हरणं त्याच्या जीवनाच्या भीतीला विसरून स्थिर होतात. भारतीय संगीताच्या या समुद्रात सूफी संगीत एक वेगळी लाट बनून आले. जेव्हा सूफी संगीत आणि शास्त्रीय संगीताची प्राचीन धाराही एकमेकांना जोडली तेव्हा आपल्याला प्रेम आणि भक्तीची एक नवी कल-कल ऐकायला मिळाली. हेच आपल्याला हजरत खुसरोच्या कव्वालीमध्ये मिळालं. इथेच आपल्याला बाबा फरीदांचे दोहे, बुल्लेशाहचे स्वर, मीरचे गाणे, कबीर, रहीम आणि रसखान यांची गाणी मिळाली. 

या संतांनी आणि औलियांनी भक्तीला एक नवा आयाम दिला. आपण सूरदास, रहीम, रसखान वाचू शकतो किंवा हजरत खुसरोला डोळे बंद करून ऐकू शकतो. जेव्हा आपण खोलात उतरतो, तेव्हा एकाच ठिकाणी पोहोचतो, ती जागा म्हणजे आध्यात्मिक प्रेमाची उंची.  जिथे मानवी बंधनं तुटतात आणि मानव आणि ईश्वराचे समरूप होताना अनुभवायला मिळतं. आपल्याला पहायला मिळेल की, आमचे रसखान मुस्लिम होते, पण ते हरि भक्त होते. रसखान देखील म्हणतात - प्रेम हरी को रूप है, त्यों हरि प्रेम स्वरूप। एक होई द्वै यों लसैं, ज्यौं सूरज अरु धूप॥ म्हणजेच प्रेम आणि हरि दोन्ही एकाच रूपात आहेत. हाच अनुभव हजरत खुसरोनाही झाला होता. त्यांनी लिहिलं होतं, "खुसरो दरिया प्रेम का, सो उलटी वा की धार। जो उतरा सो डूब गया, जो डूबा सो पार।।" म्हणजेच प्रेमात डूबल्यामुळेच भेदाच्या अडचणी पार होतात. इथे आज जी कला प्रस्तुती झाली, त्यातही आपण हेच अनुभवले.

सूफी परंपरेने फक्त मनुष्याच्या आध्यात्मिक अंतर कमी केलं नाही, तर जगाच्या अंतरांला देखील कमी केलं आहे. मला २०१५ मध्ये अफगाणिस्तानच्या संसदेत गेलो असताना एक घटना आठवते. मी मोठ्या भावुक शब्दांमध्ये रूमीला आठवले होते. आठ शतकांपूर्वी रूमी त्याच बल्ख प्रांतात जन्मले होते. मला रूमीचे एक हिंदीतले भाषांतर येथे जरूर पुन्हा सांगावं लागेल कारण ते शब्द आजही तितकेच महत्वाचे आहेत. रूमी म्हणाले होते, "शब्दांना उंची द्या, आवाजाला नाही, कारण फुलं पावसात उगवतात, वादळात नाही." त्यांचे आणखी एक वाक्य मला आठवते, ज्याचा अर्थ, "मी न पूरबचा आहे, न पश्चिमचा आहे, न मी समुद्रातून आलो आहे, न मी भूमीवरून आलो आहे, माझं स्थान कुठेही नाही, मी कुठल्या ठिकाणचा नाही, म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी आहे." हे विचार, हे दर्शन 'वसुधैव कुटुंबकम' या आपल्या भावनेशी वेगळं नाही. 

जेव्हा मी जगाच्या विविध देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतो, तेव्हा मला या विचारांमधून प्रेरणा मिळते. मला आठवते, जेव्हा मी ईराणमध्ये गेलो होतो, तेव्हा ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंसच्या वेळी मी तिथे मिर्झा गालिबचा एक शेर वाचला होता -

जनूनत गरबे, नफ्से-खुद, तमाम अस्त।
ज़े-काशी, पा-बे काशान, नीम गाम अस्त॥

याचा अर्थ असा आहे की, जेव्हा आपण जागे होतो, तेव्हा काशी आणि काशान यामधील अंतर फक्त एक पाऊल दिसतं. खरंच, आजच्या जगासाठी, जिथे युद्ध मानवीतेला इतकं मोठं नुकसान करीत आहे. तिथे हे संदेश महत्त्वाचे ठरू शकतात

हजरत अमीर खुसरो यांना ‘तूती-ए हिंद’ म्हणून ओळखले जाते. भारताच्या स्तुतीत आणि भारताप्रती प्रेमात त्यांनी गीत गायले आहेत. त्यात हिंदुस्तानाची महानता आणि आकर्षकता ज्या प्रकारे त्यांनी वर्णन केली आहे, ती त्यांच्या 'नुह-सिप्हर' या पुस्तकात पाहायला मिळते. हजरत खुसरो यांनी भारताला त्या काळातील इतर सर्व मोठ्या देशांपेक्षा महान ठरवले. त्यांनी संस्कृतला जगातील सर्वात उत्तम भाषा म्हणून ओळखले. ते भारताच्या तत्त्वज्ञांना इतर मोठ्या विद्वानांपेक्षा मोठे मानत होते. भारतातील शून्य, गणित, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचे ज्ञान इतर जगात कसे पोहोचले, कसे भारतातील गणित अरबांपर्यंत पोहोचून हिंदसा म्हणून ओळखले गेले. हजरत खुसरो त्यांच्या पुस्तकांमध्ये याचे उल्लेख करतात. गुलामीच्या काळात जेव्हा खूप काही नष्ट झाले. तेव्हा आज जी आपल्या भूतकाळाची माहिती आहे, तर त्यात हजरत खुसरो यांच्या रचनांचा मोठा वाटा आहे.

हा वारसा आम्हाला सतत समृद्ध करत रहावा लागेल. मला आनंद आहे की, 'जहान-ए-खुसरो' सारखे कार्यक्रम या जबाबदारीला उत्कृष्टपणे पार पाडत आहेत.हा कार्यक्रम अखंडपणे २५ वर्षे हे सुरू ठेवणे ही छोटी गोष्ट नाही. मी माझ्या मित्राचे खूप-खूप अभिनंदन करतो. मी परत एकदा आपल्याला सर्वांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. अडचणी असूनही या समारंभाचा आनंद घेण्याची संधी मला मिळाली त्यासाठी मी माझ्या मित्राचा हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter