जम्मू-काश्मीरमधील भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक अशा कटरा ते बनिहाल लोहमार्गावरील १८० अंशाचे वळण आणि चढ असलेल्या लोहमार्गावरील रेल्वेची उच्च वेगाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
काश्मीरला देशातील उर्वरित भागाशी रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्यावतीने उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यामुळे रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाईल, असे मत रेल्वे अधिकाऱ्यांनी बुधवारी व्यक्त केले.
‘‘या मार्गावरील रेल्वेची चाचणी यशस्वी ठरल्याने येथील रेल्वे सेवा लवकरच सुरू होईल,’’ अशी आशा रेल्वेच्या उत्तर परिमंडलाचे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) दिनेशचंद देशवाल यांनी व्यक्त केली आहे. कटरा ते बनिहाल रेल्वेच्या उच्च वेगाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर बनिहाल येथे माध्यमांशी बोलताना देशवाल म्हणाले की, आमचे पथक कटरा येथे परतल्यानंतर चाचणी दरम्यान जी माहिती संकलित करण्यात आली आहे.
त्याचे विश्लेषण करून येथील रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अहवाल देईल. ‘‘१८० अंशाचे वळण आणि चढ असलेल्या कटरा ते बनिहाल लोहमार्गावर ११० कि.मी प्रतितास वेगाने रेल्वे धावली असून, रेल्वेच्या इतिहासात हा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागातून अत्यंत व्यवस्थितपणे हा प्रवास पार पडला. त्यामुळे आम्हाला अत्यंत समाधान वाटत असून या सर्वाचे श्रेय हे आमच्या अभियंत्यांना जाते,’’’ असे देशवाल म्हणाले.
या लोह मार्गावरील उच्च वेगाची ही अंतिम चाचणी होती. ही रेल्वेसेवा नेमकी कधी सुरू होईल याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल मात्र, जी चाचणी घेतली त्यावरून व उपकरणांच्या नियमित तपासणीनुसार या मार्गाबाबत आम्ही समाधानी आहोत, असे देशवाल म्हणाले. रेल्वेने तयार केलेला हा लोहमार्ग अद्वितीय असून येथील रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असे ते म्हणाले.