कोणत्याही उद्देशाने स्थायिक होण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नव्हे. भारताला समृद्ध करण्यासाठी येणाऱ्यांचे स्वागत, पण देशाची सुरक्षा संकटात टाकणाऱ्या विदेशी नागरिकांना रोखले जाईल. असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.
ते लोकसभेत 'इमिग्रेशन आणि परदेशी प्रवासी विधेयका'वरील चर्चेदरम्यान बोलत होते. भारतातील प्रवेश, निवास आणि प्रवासाशी संबंधित प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे. हे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "पर्यटन, शिक्षण, व्यवसाय, संशोधन आणि आरोग्य सेवांसाठी भारतात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत आहे. पण रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांसारख्या सुरक्षेस धोका निर्माण करणाऱ्या नागरिकांवर कठोर नजर ठेवली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल."
पुढे ते म्हणाले, “२०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि २०४७ पर्यंत भारत विकसित देश होईल. हे उद्दिष्ट गाठण्यासाठीच हे विधेयक महत्त्वाचे ठरणार आहे.”
अमित शहा म्हणाले, "तिन्ही विद्यमान विधेयकांना पर्याय म्हणून तीन वर्षांच्या विचारमंथनानंतर हे नवीन 'इमिग्रेशन आणि परदेशी प्रवासी विधेयक' तयार करण्यात आले आहे. हे विधेयक देशाच्या सर्व गरजा पूर्ण करणारे आहे आणि त्यामुळेच भारताचे स्वप्न साकार होईल."
लोकसभेत झालेल्या चर्चेत ३० खासदारांनी आपले मत मांडले. गृहमंत्री अमित शहा यांनी बांगलादेश सीमेवरील असुरक्षिततेचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, "बांगलादेशला लागून असलेली ५६३ किमी लांबीची सीमा अजूनही खुली आहे. त्यापैकी ४५० किमी सीमेवर कुंपण घालण्याची गरज आहे, मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जमीन उपलब्ध करून देत नाहीत."
ते पुढे म्हणाले, “यापुढे भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाची नोंद व्यवस्थित, एकसंध आणि अद्ययावत पद्धतीने ठेवली जाईल. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सजग राहण्याच्या भूमिकेतून हे विधेयक तयार करण्यात आले आहे. हे विधेयक सरळ, सुदृढ आणि प्रभावी कायदे निर्माण करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter