आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत वाईट दिवस ठरला आहे. ८६००० वरून ७६००० वर पोहोचलेल्या सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना उद्ध्वस्त केले आहे. आज एका दिवसात मोठ्या घसरणीमुळे १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही प्रमुख शेअर बाजार निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी आज लाल रंगात बंद झाले.
या घसरणीत सर्वात मोठ्या कंपन्यांचे नुकसान झाले आहे. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी घसरला होता. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स १०४८.९० अंकांनी (१.३५ टक्के) घसरून ७६,३३०.०१ वर आला. तर निफ्टी ५०३४५.५५ (१.४७ टक्के) घसरून २३,०८५.९५ च्या पातळीवर पोहोचला.
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही मोठी घसरण झाली आहे. रुपया प्रथमच ८७ रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. कच्च्या तेलातील वाढ आणि महागाईचे संभाव्य आकडे हेही शेअर बाजारातील घसरणीचे कारण मानले जात आहे.
कोणते शेअर्स घसरले?
आज राष्ट्रीय शेअर बाजारात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. तर ट्रेंटचे शेअर्सही जवळपास ६ टक्क्यांनी घसरले आहेत. बीपीसीएलच्या शेअर्समध्ये ४.५ टक्क्यांची घसरण दिसून आली. बीईएल आणि अदानी पोर्टचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले.
झोमॅटोचे शेअर्स सुमारे ७ टक्क्यांनी, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरले. याउलट, ॲक्सिस बँक, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एनएसईवर एक टक्क्यापेक्षा कमी वाढ झाली आहे.
आजच्या घसरणीमुळे, २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेली सर्व तेजी बाजाराने गमावली आहे. प्रमुख निर्देशांकात आज चौफेर विक्री दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ४% पर्यंत घसरले. निफ्टी आणि सेन्सेक्स १.४% घसरणीसह बंद झाले.
आज मिडकॅप निर्देशांकात ८ महिन्यांनंतर एक दिवसाची सर्वात मोठी घसरण झाली. ५ महिन्यांनंतर आज एका दिवसातील सर्वात मोठी घसरण स्मॉल कॅपमध्ये दिसून आली.
गुंतवणूकदारांचे १२.३९ लाख कोटी रुपयांचे नुकसान
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज १३ जानेवारी रोजी ४१७.२८ लाख कोटी रुपयांवर आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार १० जानेवारीला ४२९.६७ लाख कोटी रुपये होते.
अशा प्रकारे, BSE मध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे १२.३९ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १२.३९ लाख रुपयांची घट झाली आहे.